गुहागर (प्रतिनिधी) रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी प्रचारासाठी छापलेल्या पुस्तिकेवर मुद्रक, प्रकाशक आणि प्रति यांचा तपशील छापलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यावतीने निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आली.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अनंत गीते यांच्याकडून वारंवार आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नोंदविली आहे . सुनिल तटकरे यांच्यावतीने ऍड. सचिन जोशी यांनी याबाबत लेखी तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केली. अनंत गीते यांनी निवडणूक प्रचारासाठी सिंहावलोकन नामक एक पुस्तिका काढली आहे .
यात लोकसभा मतदारसंघात खासदार निधी व इतर माध्यमांमधून त्यांनी केलेल्या कामाचा तपशील आहे . ३६ पानी या पुस्तिकेवर मुद्रक आणि प्रकाशकांची नावे छापण्यात आलेली नाहीत . तसेच किती पुस्तिका छापल्या याची नोंदही करण्यात आलेली नाही, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या पुस्तिकेची सक्षम अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे अपेक्षित आहे . पुस्तिका छापण्यासाठी झालेल्या खर्चाची नोंद करणेही गरजेची आहे. त्यामुळे अनंत गीते यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुनिल तटकरे यांच्यावतीने करण्यात आली आहे ,