रोहा येथे  डॉ. सी डी देशमुखांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने केले परखड मतप्रदर्शन    

Share Now

586 Views

रोहा (प्रतिनिधी)  संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे रोहयाचे सुपुत्र स्व. डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या १२४ व्या जयंती निमित्त रोहा शहरातील राम मारूती चौकात तालुक्यातील युवकांच्या दहा विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहभागातुन आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरिल परखड मतप्रदर्शना बरोबरच डॉ. सी डी देशमुखांच्या अजरामर कार्याची उजळणी केली. यावेळी युवकांच्या संवेदनांना वैचारिक दिशा देण्याचे काम रोहा प्रेस क्लब, रोहा युथ फोरम आणि सहभागी संस्था करीत असल्याचे प्रांताधिकारी यशवंतराव माने यांनी सांगितले.

रोहा तालुक्यातील  सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान, शिवचरण मित्रमंडळ, स्पंदन नाट्य संस्था, मावळा प्रतिष्ठान, राजमुद्रा फौंडेशन, श्रीकृपा फाउंडेशन, रोटरी क्लब, अभिनव रोहा, रोट्रैक क्लब, रोहा युवा आदी युवा संस्थांच्या सहभागातून रोहा प्रेस क्लब आणि रोहा तालुका युथ फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकुण ३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वरिष्ठ गटाच्या स्पर्धेसाठी सी डी देशमुखांचा बाणेदारपणा व आजचे राजकारण, एनकाऊंटर न्याय की आततायीपणा, गरज कशाची महिला सुरक्षिततेची की पुरूष सुसंस्कृततेची व सावरकरांचे स्वातंत्र्ययुद्धातील योगदान हे विषय होते. वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक वेदिका लांगी हिने पटकावला तर व्दितीय क्रमांक सूरज म्हशलकर, तृतीय क्रमांक सुशांत लोखंडे याने तर उत्तेजनार्थ पारितोषिक सौ. प्रियंका लोखंडे यांनी पटकावले. लहान गटासाठी डॉ. सी डी देशमुखांचे भारताच्या अर्थव्यवस्थेतील योगदान, ए पी जे कलामांचे व्हिजन २०२० स्वप्न खरच सत्यात उतरलय का, स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला युवक व २०३० मधील रोजगाराच्या संधी कशा असतील हे विषय होते. या स्पर्धेत श्रुती मरवडे हिचा प्रथम क्रमांक, सायली घोसाळकर  व्दितीय , समीक्षा म्हात्रे हिचा तृतीय तर ऋतुजा गाडे व श्रेया साखिलकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. एकुण ३७ स्पर्धकांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता. आकाशवाणी निवेदक किशोर सोमण, पत्रकार राजेंद्र जाधव व युवा वक्त्या अमृता गोडबोले यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. 

दीपप्रज्वलन केल्यानंतर डॉ. चिंतामणराव देशमुखाच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रांत यशवंतराव माने, पोलिस निरिक्षक नामदेव बंडगर, पोलिस उपनिरिक्षक सुभाष जाधव, रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब व निमंत्रक आप्पा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना वक्तृत्त्व स्पर्धेंचे आयोजन करून युवकांच्या संवेदनांना वैचारिक दिशा देण्याचे काम केले असून यामुळे युवकांना व्यक्त होण्यासाठी सध्याच्या समाजमाध्यमांच्या पेक्षाही अधिक परिणामकारक माध्यम उपलब्ध झाल्याचे उद्गार यावेळी यशवंतराव माने यांनी काढले. समाजात घडत असलेल्या घटनांकडे युवा पिढी कोणत्या दृष्टीने पहात आहे किंवा सुदृढ समाजाची गरज म्हणून त्यांनी कोणता दृष्टिकोन जपणे गरजेचे आहे याचे मार्गदर्शन या स्पर्धेतून होत असल्याचे मत रोहा प्रांत यशवंतराव माने यांनी व्यक्त केले. तर पोलिस निरिक्षक नामदंव बंडगर यांनी समाजातील चालू घडामोडींवर आधारित विषय घेऊन आयोजित समाजाच्या ताज्या संवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असून यामुळे समाजाचे विचार प्रवाह मतप्रवाह लक्षात येणे सोपे होत असल्याचे सांगितले. एनकाऊंटर व महिला सुरक्षितता या विषयांबाबतची पोलिस प्रशासनाची भूमिकाही त्यांनी सविस्तर मांडली.

यावेळी स्पर्धेतून रोह्यातील युवाशक्तीच्या विद्यमान संवेदना व त्यांचे सकारात्मक हुंकार रोहेकरांना ऐकायला मिळाले. तरूण पिढीला डॉ. चिंतामणराव देशमुखांच्या कार्याची, त्यांच्या गुणांची व त्यांच्यापासून घ्यावयाच्या आदर्श विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने युवा वक्त्यांनी विचार मांडले. वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरिल परखड मतप्रदर्शना बरोबरच डॉ. सी डी देशमुखांच्या अजरामर कार्याची उजळणी केली. निनाद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर स्पर्धा समिती प्रमुख रोशन चाफेकर यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समिती प्रमुख पराग फुकणे, रोशन चाफेकर, प्रेस क्लब जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, रोहा प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत मोरे, सरचिटणिस नंदकुमार मरवडे, युथ फोरमचे निमंत्रक हाजी कोठारी, अँड. हर्षद साळवी, विनित वाकडे, अमित कासट, उमेश वैष्णव, आकाश रुमडे, वैष्णवी पोटे, किरण कानडे, प्रतिक राक्षे, चेतन कोरपे, वैभव आठवले, समीर पेणकर, दिनेश जाधव, ऋतुराज अष्टीवकर, धैर्या वात्सराज आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *