कोरस कंपनीमध्ये  सहा कामगारांना वायुबाधा, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कामगार वर्गात घबराट 

Share Now

1,800 Views

रोहा (महेंद्र मोरे) धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांनी प्रदुषणाचे थैमान घातले असतानाच कंपनी अंतर्गत अपघाताची मालिका सुरुच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. प्रसिद्ध असलेल्या कोरस इंडिया या कंपनीमध्ये गुरुवारी पाच ते सहा कामगारांना  वायुबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली. कंपनीच्या पाच नंबर प्लांटमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरु असताना तेथे काम करणाऱ्या कामगारांना वायुबाधा झाली. कंत्राटी व  कायम अशा सहा कामगारांना ही बाधा झाल्याचे उघड झाले. त्या सर्व वायुबाधीत कामगारांना तातडीने शहरातील  डॉ. जाधव हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी कोरस प्रशासनाने कामगार सुरक्षा नियमांना हरताळ फासण्याचा प्रताप सुरुच  ठेवल्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. दरम्यान, सततच्या कामगार अपघातांच्या घटनांमुळे कामगार वर्गात एकच घबराट पसरल्याचे समोर आले आहे.          

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील दुसऱ्या पाळीतील कामगार प्लांट पाचमध्ये उत्पादन प्रक्रियेचे काम करत होते. त्यावेळी कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माण झालेल्या ॲसिटॉन या वायुच्या संपर्कात आल्यामुळे  याची बाधा होत कामगारांची प्रकृती खालावली. यामध्ये म्हाबिर टुडु वय 24 रा. युपी,सुनिल शाव वय 31 रा. युपी, चंद्रकांत ढउल वय 56 रा. भवन, प्रवीण साबळे वय 32 रा. धाटाव, तुषार काफरे वय 30 रा. रोहा, निखिल सुर्वे वय 38 रा. रोहा या कायम व कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. या सर्व कामगारांना तातडीने   डॉ. जाधव यांचेकडे उपचार मिळाल्यामुळे आता ते सर्व कामगार सुखरुप आहेत. या दुर्घटने संधर्भात कामगार कल्याण व आरोग्य विभागाचे कारखाना निरीक्षक मोहिते यांचेकडे चौकशी केली असता या घटनेची कोणतीही माहिती कोरस कंपनी प्रशासनाने दिलेली नाही. नियमांनुसार कोणतीही दुर्घटना झाल्यानंतर 12 तासांत त्याबद्दल आमच्याकडे कळविणे बंधनकारक आहे. कोरस प्रशासनाच्या या हलगर्जीपणाची सखोल चौकशी करणार असेही मोहिते यांनी सांगितले आहे. 

वायुबाधीत कामगारांपैकी एकाची प्रकृती खालावल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी शुक्रवारी पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक पोवळे यांच्याकडे चौकशी केली असता कामगारांना वायुबाधा झाली असल्याचे मान्य केले. वायुबाधा झाल्यानंतर तातडीने सर्व कामगारांना उपचारार्थ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील एका अत्यवस्थ कामगाराला पनवेल येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. आता सर्व कामगारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. ही वायुबाधा कशामुळे  झाली याचा तपास आम्ही करीत आहोत असे पोवळे यांनी अधिक सागितले.  सामाजिक कार्यकर्ते सुरेश मगर यांनी धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये होणारे प्रदूषण व वारंवार घडणारे अपघात याबद्दल संताप व्यक्त केला.  या घटनेमध्ये कोरस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्यामुळे याचा निषेध करत या मुजोर व्यवस्थापनाला धडा शिकविण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडे तक्रार करणार असल्याचे सलाम रायगडजवळ सांगितले. त्यामुळे सतत कारवाईच्या भोवऱयात अडकलेल्या कोरस कंपनीवर पुन्हा काय कारवाई होते ? हे पाहावे लागणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *