ऐतिहासिक वारसा लाभलेली, आगळीवेगळी तळाघर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाची यात्रा

Share Now

747 Views

रोहा(प्रतिनिधी) रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली, महाराष्ट्रातील आगळीवेगळी बहुजन समाजाच्या प्रथा, परंपरा जपणारी तळाघर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाची यात्रा 13/14-4-2019 ला आहे . या यात्रेत महादेवाचे लग्न आणि त्यानंतर सबिना हे विधी होतात. ते पाहण्यासाठी तळा, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा व इतरत्र ठिकाणाहून भाविक मोठय़ा संख्येने गर्दी करतात. प्रसाद म्हणून दिले जाणारे चिंबोरीचे काळवण हे या यात्रेचे वैशिष्टय़ आहे.

या यात्रेत महादेवाच्या विवाहाचे सर्व विधी, मानपान बहुजन समाजाद्वारे करण्यात येतात. जत्तरच्या काठय़ा हे या यात्रेचे आकर्षण असते. या यात्रेत कोळी बांधव महादेव वाडीच्या सुतारांची गळाभेट घेण्यासाठी पायी येतात. लग्न विधी करण्यासाठी सात गावचे जंगम येतात. रात्री बारा वाजता लग्नाचा मुहूर्त असतो. विधीसाठी लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात.

तळाघरचे मोरे दीपमाळ लावतात. खारगांव येथून पालखी येते. बामुगडे घराणा मानाची निमंत्रणे द्यायला जातो. सोनगावचे ग्रामस्थ तेलवण, वरातीचे आमंत्रण देतात. धाटावहून काठी तेलवणाच्या दिवशी येते. पालखीला तारेगावचे भोई असतात. मग शिवपार्वतीची जत्तर काठीवर प्रतिष्ठापना होते. वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात.

सुतार भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेऊन विवाहास बसतात. शेजारी धाटावचे रटाटे असतात. किल्ल्याची करवली, तळाघरचा करवला उभा असतो. यावेळी स्थानिक पोलीस पाटलांना विशेष मान असतो. मंगलाष्टका धाटाव, लांढर, भुवेनश्वर, देवकान्हेचे जंगम म्हणतात. असा हा सोहळा दोन दिवस रंगतो. या सर्व प्रथा-परंपरा पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे भाविकांची प्रचंड गर्दी असते. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सरपंच, सदस्य, तळाघर ग्रामस्थ, पंचक्रोशी, यात्रा समिती अत्यंत तळमळीने व भावनेने परिश्रम घेतात.  या यात्रेला ऐतिहासिक वारसा असल्याचे पुरावे आहेत. जंजिरा संस्थानच्या सिद्दीची आई ही महादेवाची भक्त होती असा उल्लेख आहे. तर यात्रेचे मानसन्मान हे शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. पेशवे आणि सिध्दी यांच्यात झालेल्या करारात तळाघर यात्रेचा उल्लेख आहे, अशी माहिती डॉ. श्रीनिवास वेदक यांनी दिली आहे. दि.13/04/2019-  14/04/2019.  रोजी सर्वांनी  महादेव यात्रेला यावे असे आवाहन  तळाघर ग्रामस्थ यांनी केले आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *