कोकण विभागीय वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथमेश उंबरे अव्वल, कलिना कॅम्पस मुंबईने पटकावला मानाचा फिरता चषक 

Share Now

460 Views

रोहा (प्रतिनिधी) रोह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. सी. डी. तथा चिंतामणराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहा व डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथमेश उंबरे याने कोंकण विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त करीत स्पर्धेचा मानकरी ठरला, तर या स्पर्धेचे आकर्षण असलेला मानाचा फिरता चषक यंदा सर्वोत्तम कामगिरी केलेल्या कलिना कॅम्पस मुंबईने महाविद्यालयाने पटकाविला आहे.        

या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कोकणातिल तरुण विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला. प्रासंगिक, दैनंदिन, ज्वलंत, राजकिय, सामाजिक आणि भावस्पर्शी आदी विविध विषयांवर परखड आणि सडेतोड मत प्रदर्शन करताना युवा – युवतींनी हे व्यासपीठ दणाणून सोडले. यात जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणेचा विद्यार्थी प्रथमेश अनिल उंबरे अव्वल ठरला, महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी लक्ष्मण कचरे द्वितीय, कलिना कॅम्पस मुंबईचा किरण संजय कीर्तिकर त्रुतीय तर आदर्श कॉलेज बदलापूरचा वैभव अरविंद बोराडे व द. गा. तटकरे कोलाडची विद्यार्थीनी पूर्वा रविंद्र चव्हाण यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. अनिल बांगर व प्रा. डॉ. राजेंद्र आचार्य यांनी केले. परीक्षकांसह सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विजेत्यांना रोख पारितोषिक व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, उपनगराध्यक्ष समिर सकपाळ, प्राचार्य अतुल साळुंखे, ट्रस्टचे अध्यक्ष राजेश काफरे, सल्लागार श्रीनिवास वडके, माजी अध्यक्ष अमित उकडे, किशोर तावडे, उद्योजक सचिन शेडगे, नितीन वारंगे, निलेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर आणि प्रा. डॉ. सुकुमार पाटील यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित केले. स्पर्धेच्या अयोजनासाठी ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश काफरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे कार्यवाह विशाल साळवी, विश्वस्त निलेश शिर्के, वैभव आठवले, ऍड. हर्षद साळवी, ट्रस्टचे आजी माजी पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आदिंनी परिश्रम घेतले. निखिल दाते यांनी सूत्रसंचलन तर प्रा. कांबळे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *