तरुण पिढी गांजा, अफूच्या विळख्या’त, शहरातून होतोय नियोजनबध्द पुरवठा, रोहा पोलिसांसमोर मोठे नवे आव्हान, धूर रोखणार ?  

Share Now

848 Views

रोहा (प्रतिनिधी) तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात आहे. आधीच ठिकठिकाणी सहज मिळणारी रासायनियुक्त  विषारी ताडीमाडीने असंख्य तरुण कमजोर झालेत. सरकारमान्य ताडीमाडी विक्रेते शुध्द माडीत रसायन पाणी टाकून अक्षरशः विष बनवितात. ताडीमाडी प्यायल्याने पोट सुटणे, त्वचा निस्तेज पडणे, डोळे आत जाणे असा व्यधी जडतात. याच ताडीमाडीने आतापर्यँत अनेकांचे बळी घेतले. तरीही उत्पादन शूल्क विभाग सुस्त आहे, पोलीस गांभीर्याने लक्ष घालीत नाहीत, हे भयान वास्तव असतानाच हीच तरुण पिढी आजकाल गांजा, अफूच्या विळख्यात अडकत चालत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. रोहा शहरातील प्रसिध्द बंदर पकटी ते बायपास रोड  परिसरातून विषारी गांजा शहर व ग्रामीणात पुरवठा होतो. त्याच गांजाच्या धुराने असंख्य तरुणांचे फुफूस निकामी होत आहेत. महादेववाडी, तळाघर, कोलाड, चणेरा, वरसे विभागातील काही तरुण गांजाचा धूर काढत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे आमच्या मुलांना वाचवा, गांजाचा धूर रोखा अशी विनवणी अनेक बायाबापड्यांनी सलाम रायगडकडे केली. दरम्यान, शहरातील काही तरुण बेधडक गांजाची विक्री करतात, याची कुणकूण प्रशासनातील काहींना आहे, पण कोणीच कारवाई करीत नाही, असा आरोप नेहमीच होत आलेय, तर विशेष पोलीस सेवापदक विजेते, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर गांजाच्या धुरात अडकलेल्या तरुण पिढीला आता मुक्त करतात का, सबंधीत चोराटी गांजा विक्रेत्यांचा शोध घेऊन विक्रेत्यांचा कायम बंदोबस्त करतात का ? हे आव्हानात्मक बोलले जात आहे.
 
आजच्या तरुण पिढीला बरबाद करण्याचे कारस्थान काहींनी अविरत सुरु ठेवले. कितीही निर्बंध असले तरी बहुतेक टपरीवर मिश्रीत गुटखा विक्री, मटक्याचे आकडे कायम सुरु असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मटक्यावर रोहा पोलिसांनी धाडी टाकून काहींना अटक केली, त्याबाबत सृजन नागरिकांनी पोलिसांना धन्यवाद दिले. दुसरीकडे विषारी ताडीमाडीची विक्री खुलेआम सुरु आहे. विषारी ताडीमाडीला रोक लावण्यात उत्पादन शुल्क विभाग कायम अपयशी ठरला. मूळात ताडीमाडीचे नमूने घेऊन तपासणी होत नाही. त्यामुळे एक लिटरची शुध्द  ताडीमाडी रसायन टाकून सात लिटर केली जाते, हे खुद्द ताडीमाडी शौकीनांनी सांगितले. हीच ताडीमाडी पिऊन आतापर्यँत शेकडो तरुण निकामी झाले. अशात उत्पादन शूल्क विभाग शुद्धीवर आहे का ? असा सवाल पुन्हा उपस्थित झाला. याउलट रोहा पोलीसही ताडीमाडीच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत, याच चर्चेत गांजाची चोराटी विक्री पुन्हा तेजीत आली. दोनतीन वर्षापूर्वी गांजा विक्रेत्यांना रोक लावला होता. त्यानंतर कारवाई शिथील झाल्याने पुन्हा विक्रेते सक्रीय झाले. त्यांनी नियोजनबध्द जाळे विणून शहर व दूरपर्यँतच्या ग्रामीण भागात गांजाचा पुरवठा सुरळीत ठेवल्याचे अधिकृत वृत्त आहे. महादेववाडी, मळखंडवाडी, वरसे हद्द यांसह शहर व ग्रामीण भागात नेहमीच गांजा पोहचत आहे, अशात तरुणांना उद्ध्वस्त करणाऱ्या गांजाचा धूर रोखण्याचे आव्हान रोहा पोलिसांवर आहे. त्यामुळे पोलीस गांजा विक्रेत्यांचा कसा समाचार घेतात ? हे पाहावे लागेल.
 
रोहा पोलिसांची बेधडक कारवाई सर्वश्रुत आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आधी मटका धंदेवाईकांना चाप बसविला. त्यापाठोपाठ उपविभाग क्षेत्रातील गावठी हातभट्टीवर यशस्वी धाडी टाकून हातभट्टी उत्पादकांना चांगलीच जबर बसविली. इंडो एनर्जी जेटी प्रकरणात ओव्हरलोड  वाहतूकीवर अंकूश ठेवण्याला प्रारंभ केले. त्यामुळे रोहा पोलिसांकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या. गुटखा, ताडीमाडी मुख्यतः गांजा, अफूच्या विळख्यातून तरुणांना मुक्तता द्यावी, चोरटी गांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी झाली. गांजाचे पूर्वीचे वितरक पुन्हा जागे झाले, कारवाईचा प्रभाव कमी झाल्याने तेच गांजा विक्रेते शहर व सर्वदूर प्रचंड चढया  भावाने गांजाची विक्री करतात, गांजाचे धूर काढणारे तरुण डोंगराळ, कालवा, रस्त्याच्या आडोशाला दिसून येतात. अनेकांना गांजा ओढणारे तरुण नेहमीच दिसून येतात. याचे पडसाद प्रजासत्ताक दिनी वरसे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उमटले. ठिकठिकाणी दारू प्यायला बसणारे तरुण, गांजाचा धूर काढणाऱ्या तरुणांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, असा ठरावही घेण्यात आला. त्यामुळे वाढते गांजा वितरण रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले. याच गांजाचा धुराला नवे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर रोखतात का, रोहा पोलीस गांजा विक्रीची कितपत दखल घेतात, गांजा विक्रेत्यांना पकडून कारवाई करतात का ? हे लवकरच समोर येणार आहे.  
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *