गांजा विक्रेत्यांचा लवकरच ‘बंदोबस्त’ होणार , रोहा, कोलाड पोलीस यंत्रणा सज्ज, विषारी ताडीमाडीचे काय ?

Share Now

488 Views

रोहा (प्रतिनिधी) गांजा अफूच्या विळख्यात तरुण पिढी गुरफटून गेली. अत्यंत नियोजबद्ध गांजा शहरासह सर्वदूर ग्रामीणात जातो, असे वृत्त टाइम्समध्ये झळकताच त्याची दखल रोहा मुख्यतः कोलाड पोलिसांनी घेतली. आम्ही गांजा, अफू विक्री करणाऱ्या टोळीच्या जवळ गेलोत, तुम्हाला लवकरच गांजा विक्रेत्याचा बंदोबस्त केलेला दिसेल, असा विश्वास कोलाड पोलिसांनी व्यक्त केला. शहरातील बंदर रोड ते बायपास रस्त्यावरील एकदोन इसम गांजाची विक्री करतात, मागील गांजा धाड प्रकरणात पकडूनही त्यांना समज आलेली नाही. गांजा विक्री पुन्हा सुरु केली. याच गांजा, अफूने कोलाड, वरसे, चणेरा सर्वच विभागातील तरुणांना नासवले, गांजाच्या धुराने शरीरातील फुफुस निकामी केले. गांजा पुरवठ्याचे प्रमाण वाढल्याने मोठी चर्चा झाली. वरसे ग्रामसभेत विषय चर्चेला आली. अखेर सलाम रायगडने गांजा धूरावर प्रकाशझोत टाकताच पोलीस यंत्रणा सज्ज झाली. गांजा विक्रेत्यांचा धूर काढणार ? असे संकेत पोलिसांनी दिले. दरम्यान, गांजा विक्रेत्यांचा पोलीस लवकरच बंदोबस्त करतील, मात्र शहरात खुलेआम भेसळयुक्त विषारी ताडीमाडीची विक्री होते, त्यावर अंकुश कोणाचे, उत्पादन शुल्क विभाग गांभीर्याने दखल घेत नाही, त्यामुळे आता उत्पादन शुल्क जिल्हा प्रशासन लक्ष घालील का ? असा सवाल पुन्हा नव्याने उपस्थित झाला.

जिल्हा मुख्यतः रोहा तालुक्यात नशिला पदार्थ विक्रीत मोठी वाढ झाली. आधीच अनेक टपऱ्यांवर गुटखा मिळतो. गुटख्याचे मुख्य केंद्र पेण, नागोठणे असल्याचे अनेकदा उघड झाले. गुटखा विक्री रॅकेटमध्ये अनेक पांढरे सज्जनही असल्याची तुफान चर्चा पेणमध्ये ऐकायला मिळते. हाच गुटखा इतरत्र वितरीत होतो. त्यासोबत आता गांजा, अफ़ू विक्रीलाही जोश आला. कधी नव्हे ते ग्रामीणातही गांजा धूर पाहायला मिळाला. अनेक तरुणांना धूर काढताना महादेववाडी, वरसे, कोलाड हद्दीत पकडले आणि गांजा विक्री रॅकेट कार्यरत असल्याचे प्रकरण समोर आले. टाइम्समध्ये गांजा विक्री रॅकेटचे बिनचूक ठिकाण देताच मुख्यतः कोलाड पोलीस सतर्क झाले. आम्ही रॅकेटजवळ पोहचलो आहोत, लवकरच गांजा रॅकेटचा पर्दाफाश करू अशी प्रतिक्रिया कार्यक्षम सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांनी सलाम रायगडला दिली. आता गांजाचा धूर रोखला जाईल असा विश्वास सामान्यांतून व्यक्त झाला. दुसरीकडे शहरात खुलेआम विक्री होणाऱ्या विषारी ताडीमाडीचे काय, आतापर्यंत अनेकांना भेसळयुक्त ताडीमाडीने जायबंद केले, दोन वर्षात दोघांचा मृत्यू झाल्याचे अप्रत्यक्ष समोर आले. महागडी दारू परवडत नसल्याने अनेक तरुण, आदिवासी बांधव ताडीमाडीकडे वळतात, त्याचाच फायदा ताडीमाडी विक्रेते घेतात, हे धडधडीत वास्तव नाकारता येणार नाही, अशात ताडीमाडीच्या गुणवत्तेवर अंकुश ठेवणार कोण ? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली.

शहरातील सरकारमान्य ताडीमाडी केंद्रात भेसळयुक्त ताडीमाडी विक्री होते, असे खुद्द शौकीन सांगतात. आम्हाला शुद्ध ताडीमाडी मिळत नाही. रसायनमिश्रित ताडीमाडीने पोट फुगणे, डोळे आता जाणे, शरीर निस्तेज पडणे, अशा व्याधींना सामोरे जावे लागते. एक लिटर शुद्ध माडीचे सफेद रसायनमिश्रणाने सात लिटर केली जाते. हा सर्व भेसळयुक्त प्रकार सर्रास सुरु आहे. हीच ताडीमाडी पिऊन दोन वर्षांपूवी एक तरुण मृत्युमुखी पडला. हे प्रकरण प्रचंड गाजले होते तर आठवडापूर्वी दुसरा तरुण ताडीमाडीच्या विषाने मृत्युमुखी पडला आणि भेसळयुक्त ताडीमाडीची चर्चा पुन्हा सुरु झाली. विषारी ताडीमाडीवर अंकुश कोणाचे ? असा सवाल उपस्थित झाला. उत्पादन शुल्क विभाग ताडीमाडी प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. यामागे नेमके गौडबंगाल काय ? असेही बोलले जाते. याबाबत उत्पादन शुल्क रोहा मुरुड विभागाचे निरीक्षक आनंद पवार यांनी आम्ही दर महिन्याला ताडीमाडी केंद्रातून नमूने तपासासाठी घेतो, आमचे ताडीमाडी विक्रीच्या शुद्धतेवर नियंत्रण आहे, तरीही तक्रारी असल्यास ताडीमाडी शुद्धतेची तपासणी करू, दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करू असे दूरध्वनीवरून टाइम्सला सांगितले. तर ताडीमाडीत रसायणमिश्रीत भेसळ बेधडक केली जाते, या प्रश्नावर पवार निरुत्तर झाले. दरम्यान, शहर यांसह ग्रामीणांत गांजाच्या धुरावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. लवकरच गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश होईल या चर्चेत आता उत्पादन शुल्क विभागही ताडीमाडीच्या जीवघेण्या भेसळीवर अंकुश ठेवील का, त्याबाबत जिल्हा उत्पादन शुल्क विभाग मुरुड रोहा विभागीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना काय सुचना करतात, ताडीमाडीतील भेसळ विषाला रोखणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *