रोहा तालुक्यात वादळी वा-यासह पावसाचे थैमान, घरांचे पत्रे व कौले उडून गेले, लाखोंचे नुकसान

Share Now

1,015 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यात वादळी वा-यासह पावसाने थैमान घातले. बुधवारी 29 एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वा-यासह पावसाची जोरदार हजेरी लागल्याने कित्येक घरांचे पत्रे व कौले उडून गेले, बाहे गावात दोन विद्युत खांब पडले. त्याचबरोबर विद्युत वाहिन्या लोंबकळत होत्या. शेकडो झाडे उन्मळून खाली पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहाणी नाही. मात्र लाखोंचे नुकसान झाल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत.रोहा तालुक्यातील चणेरा, तांबडी, खांब व कोलाड विभागातील नागरिकांच्या घरांचे छप्पर उडून गेल्याने त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा इतका भयानक होता कि, बाहे गावातील पवार यांच्या घराचे छप्पर उडून पन्नास मिटर दूर फेकले गेले. सलग दिड तास हा हाहाकार पाहुन गावातील नागरीक घाबरुन गेले होते.

ग्रामीण भागातील नागरिक यांचा उदरनिर्वाह पूर्णतः शेतीवर अवलंबून असल्याने एकिकडे शेतीचे आतोनात नुकसान तर दुसरीकडे वादळी वा-याने व पावसाने घर उद्ध्वस्त केल्याने नागरिकांचा निवारा पुर्णपणे निसर्गाने हिरावून घेतला. बाहे गावातील गणेश थिटे, अशोक थिटे, धर्मा देवकर, सुदाम पवार, दत्तात्रय थिटे, दिलीप गोविलकर, शंकर देवकर , मंगेश सालसकर, मारुती माठल , लिंम्बाजी टिकोणे, गणेश देवकर, दुर्गा दत्तात्रेय ठमके, विश्वास थिटे, विष्णू निकम, चंद्रकांत राऊत, नंदा जाधव, बेबी तानाजी पवार, रमेश साळवी, राजेश चव्हाण, पांडुरंग मालुसरे, यशवंत मनवी, मधुकर साळवी, विलास भोईर देवकान्हे गावातील नथुराम जवरत, विलास मोहिते, प्रकाश बामणे यांच्या घराचे फार मोठे नुकसान झाले आहे.

रोहा कोलाड राज्यमार्गावर देखील झाडे उन्मळून पडल्याने काही काळ या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. याशिवाय या मार्गालगत असलेल्या इमारतीच्या शेडचे पत्रे उडून राज्यमार्गावर पडले होते. महत्वाचे म्हणजे रोहा शहारासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत झाला होता. त्यामुळे खुप मोठा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागला. आता ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास महवितरणाला कितपत यश येत आहे याची वाट पहावी लागेल. मागील एक दोन वर्ष असाच वादळी वा-यासह पावसाने ग्रामीण भागातील बाहे व देवकान्हे गावातील कित्येक घरांचे नुकसान झाले होते. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व पोलिस पाटील यांनी पंचनामे ही केले होते. मात्र नागरिकांना नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. आता पंचनामे केल्यावर तहसीलदार व प्रांताधिकारी नागरिकांच्या नुकसान भरपाईकडे लक्ष घालतील का ? असा सवाल येथील नुकसानग्रस्त नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *