अखेर कोरोनाचा रोहयाला ‘विळखा’, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह, एकच खळबळ अलिबाग येथे उपचार, रुग्णांची प्रकृती स्थिर

Share Now

25,561 Views

रोहा (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले. रोज कोरोना बाधितांचा आकड़ा वाढता आहे. त्यात पाली, रोहा, म्हसळा वगळता सर्वच तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे रोहा शहर, ग्रामीणातील नागरिक निर्धास्त होते. रोहा, कोलाड, नागोठणे, चणेरा भागात लोक रस्त्यावर सर्रास फिरत होते. अशातच शुक्रवारी म्हसळ्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आणि रोहयाच्या वेसीवर कोरोना आला की काय ? ही भीती अखेर शुक्रवारीच रात्रों खरी ठरली. मुख्यतः कोलाड विभागातील ऐनवहाळ गावातील तीन, घोसाळे विभागातील भालगांव गावातील दोघांचे मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रोहयात कोरोनाने दमदार एंट्री केल्याचे समोर आले. अखेर कोरोनाने रोह्यला विळखा घातल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, स्थानिक प्रशासन यांच्याकडे शनिवारी दुपारपर्यन्त सविस्तर माहीती नसल्याचे समोर आल्याने प्रशासनात संभ्रमावस्था असल्याचे स्पष्ट झाले. तर ऐनवहाळ गावात तीन रुग्ण, भालगांव गावात दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्या सर्व रुग्णांवर अलिबाग येथिल जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु आहे, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहीती तहसिलदार कविता जाधव यांनी दिली.

कोरोनाने अखेर म्हासळा पाठोपाठ रोहयात शिरकाव केला. ऐनवहाळ गावात भांडुप मुंबई मधून १७ मे रोजी आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा झाली. त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने स्वबचे नमूने जे जे रुग्णालयात मुंबई येथे पाठवण्यात आले होते. त्या रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी रात्रों पॉझिटिव्ह आले. त्या रुग्णांना उपचारार्थ अलिबाग येथे हलविण्यात आले. त्यात महिला ६५ वर्षे, पुरुष ४८, तरुण २६ असा समावेश आहे. दुसरीकडे भालगांव गावातील कुटुंबातील दोघेजण लालबाग मुंबईतून १४ मे रोजी गावी आले. मजल दरमजल करीत रोहयातून एका खाजगी मॅजिक गाडीने भालगांव येथे गेले. त्यांच्यातही लक्षणे आढळल्याचे समजताच स्थानिक प्रशासनाने स्वब नमुने तपासणीसाठी पाठविले. यातील पुरुष स्री वय अंदाजे 50 असे आहे, संपर्कात आलेल्या लोकांना सतर्क करण्यात आले. दोन्ही गावांच्या सीमा बंद करून खबरदारीच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी अधिक माहीती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे.

रोहा शहर, ग्रामीणात मुख्यतः मुंबई , ठाणे , पनवेल नालासोपारा व कोरोना बाधीत हॉटस्पॉट विभागातून हजारोंच्या संख्येने नागरिक आले. तब्बल महिनाभर मुंबई, ठाणे येथून चाकरमानी गावी येणे सुरुच आहे . त्यामुळे रोह्याला कोरोना विळखा घालणार ? हि भीती अखेर खरी ठरली. मुंबई, ठाणे परिसरातून आलेल्या चाकरमानी लोकांची प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, त्यांना क्वॉरंटाईन करावे, वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी करावी अशी मागणी वारंवार होत होती. त्यात संबंधित प्रशासन अंशतः सतर्क राहिले. तरीही बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या लोकांना मुभा मिळाल्याने जे व्हायचे तेच झाले. उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडले का ? असा सवालही आता उपस्थित होत आहे. ऐनवहाळ गावात 3 भालगावांत कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याने अजूनही प्रशासनाकडून ठोस रोड मॅप मिळाले नाही. त्यामुळे प्रशासनातील गोंधळाची स्थिती दिसून आली. दुसरीकडे तालुका आरोग्य विभागाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. शुक्रवारी दुपारपर्यंत सर्वच प्रशासनात एकमत दिसून आले नसल्याचे बोलले जाते. दरम्यान, पालकमंत्री आदिती तटकरे,खा. सुनिल तटकरे यांचे होमग्राऊंड असलेल्या रोह्याला कोरोनाने अखेर विळखा घातला.आता प्रशासन सबंध तालुक्यासाठी काय खबरदारी घेतो, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला कितपत यश येते ? याचीच भितीयुक्त चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *