कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची उपजिल्हा रूग्णालय रोहा येथे होणारी हेळसांड प्रशासनाने थांबवावी, शिवसेना रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांची प्रशासनाकडे आग्रही मागणी

Share Now

737 Views

रोहा (निखिल दाते) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू असतांना दोन महिने रोहा तालुका हा पूर्णपणे कोरोनामुक्त होता. दिनांक 23 मे रोजी पाच पॉझिटिव्ह रुग्ण रोहे तालुक्यात सापडले आणि त्यानंतर हा आकडा वाढत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम करत असताना उपजिल्हा रूग्णालय येथे तपासणीसाठी आणण्यात येणाऱ्या या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची हेळसांड होत असल्याचे रोहा तालुका शिवसेना प्रमुख समीर शेडगे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असून त्यांच्यासाठी काही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी समीर शेडगे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे हे रोह्यासाठी व रोहेकरांसाठी अत्यंत सजगतेने कार्यरत असतात .कोरोनाच्या या संकटाच्या काळातही ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात असून कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढू नये यासाठी प्रशासनाला शक्य ती सर्व मदत ,सहकार्य व आवश्यक त्या सूचना करतांना दिसत आहेत ,जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवून जनता व प्रशासन यातील दुवा बनण्याचे महत्वपूर्ण काम ते सातत्याने करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची उपजिल्हा रूग्णालय रोहा येथे हेळसांड होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने,तहसिलदार कविता जाधव ,मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली तसेच उपजिल्हा रूग्णालय रोहा येथे तपासणी दरम्यान होणाऱ्या दिरंगाईमुळे पाणी व अन्नासाठी हे रुग्ण आजूबाजूच्या दुकानात जात असल्याने यापैकी दुर्दैवाने कोणी बाधित असल्यास संसर्ग झपाट्याने पसरण्याचा संभाव्य धोका त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

उपजिल्हा रूग्णालय रोहा येथे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी एक स्वतंत्र दालन तयार करावे व तेथे या व्यक्तींची पाणी व भोजनाची व्यवस्था व्हावी अशी आग्रही मागणी समीर शेडगे यांनी प्रशासनाकडे केली आहे. सदर रुग्णांबाबत आम्हाला माहिती दिल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शिव भोजन थाळीच्या माध्यमातून आम्ही सदर रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करू अशी जबाबदारीही समीर शेडगे यांनी स्वीकारली आहे. समीर शेडगे यांनी सर्व रोहेकरांच्या मनातील भावना व्यक्त केल्या असून प्रशासनाने या गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन उचित कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी रोहे तालुका व शहरातील नागरीक व्यक्त करतांना दिसत आहेत आता यावर प्रशासन किती सतर्कतेने उपाययोजना करते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *