रोहा तालुक्यात निकृष्ट पोषण आहाराचे ‘वितरण’ तांदुळाच्या वजनात लबाडी, धक्कादायक प्रकार समोर सबंधीत ठेकेदारावर कारवाई करणार; गटविकास अधिकारी

Share Now

1,340 Views

रोहा ( राजेंद्र जाधव ) देश, राज्यात सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना सकस व स्वच्छतेच्या विचाराला मूठमाती देण्याचा प्रताप शालेय पोषण आहार वितरक ठेकेदार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. माणगांव तालुक्यात रेशनिंग धान्य व राकेलची काळा बाजारात विक्रीची चर्चा सुरू असतानाच रोहा तालुक्यातील अनेक शाळांना शालेय निकृष्ट पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. तांदुळाच्या वजनात मोठी लबाडी केल्याचे खुद्द गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, पत्रकार यांच्या उपस्थितीत उघड झाली. तूरडाळ, हरभरे निकृष्ट दर्जाचे, मसाले व तेलाची वैधता संपली होती. निकृष्ट धान्य सबंध शाळांत वितरण करण्यात आले. त्यातील महदेववाडी, तळाघर, रोठ, धाटाव, किल्ला, भुवनेश्वर व इतर शाळांतील धान्याची पाहणी संबधीत अधिका-यांनी केली. त्यावेळी हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, सालासार ट्रेडिंग कंपनीकडे धान्य वितरणाचा ठेका आहे, याबाबत स्थानिक ठेकेदार अनुपम कुलकर्णी यांना जाब विचारले जाईल. निकृष्ट धान्य वजनात लबाडी करणा-याविरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रीया गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी केल्याने संबंधित वितरण कंपनी व ठेकेदारविरोधात नेमकी काय कारवाई होते ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रायगड मुख्यतः रोहा तालुक्याला विविध धान्य घोटाळा नविन नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी धान्याचा काळाबाजार होत आहे. सर्वच यंत्रणा कोरोना उपायात गुंतली असताना त्याचाच फायदा रेशनींग धान्य, अंगणवाडी खाऊ वाटप व शालेय पोषण आहार ठेकेदार उचलत आहेत. धान्य वितरण वाटप प्रक्रियेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने पोषण आहार वाटप ठेकेदार काय करु शकतात. ? याची धक्कादायक प्रचिती मंगळवारी रोहा तालुक्याने घेतली. सालासार ट्रेडिंग कंपनीकडे एजन्सी असलेल्या ठेकेदार अनुपम कुलकर्णी यांनी रोहा तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांना आठवड्यात विविध धान्य वितरण केले. त्यात तूरडाळ, चणा, मिठ, चटणी, मसाला, हळद असे वैद्यता संपलेले मसाल्याचे पदार्थ, सोयाबीन तेल निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रथम स्थानिक ग्रामस्थ कृष्णा बामणे, जितेंद्र जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पत्रकार व गटविकास अधिकारी यांना तातडीने कळविले. पत्रकारांच्या रेट्यानंतर पंचायत समिती प्रशासन जागे झाले. मंगळवारी सायंकाळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, गटशिक्षण अधिकारी सादूराम बांगारे व पत्रकारांनी महादेववाडी, तळाघर, किल्ला व अन्य शाळांना भेट देऊन तक्रारीतील धान्याची पाहणी केली. त्यावेळी धान्य वितरण करणा-या ठेकेदाराची लबाडी समोर आली. तूरडाळ, हरभरे, मसाल्याचे पदार्थ अत्यंत निकृष्ठ असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले. तांदळाच्या वजनात एका पोत्यामागे चारपाच किलो घट दिसून आल्याने खुद्द अधिकारी अक्षरश: चक्रावून गेले. मात्र मागील वर्षभर सबंध शाळांना निकृष्ठ धान्य, वजनात घट असलेल्या तांदुळाचा पुरवठा होतो, अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही, शालेय शिक्षक, केंद्रप्रमुख मूग गिळून गप्प राहतात? असा आरोप ग्रामस्थ जितेंद्र जाधव यांनी केला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाल्याने त्यामागे नेमके गौडबंगाल काय ? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

रोहा तालुक्यात पहिली ते पाचवीपर्यंत 261 शाळा,पटसंख्या 6 हजार 880, सहावी ते आठवी पर्यंत 78 शाळा,पटसंख्या 4 हजार 685, शहरी भागात 13 शाळा आहेत. तालुक्यातील एकूण 11 हजार 565 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय पोषण आहार अंतर्गत फेब्रुवारी 2020 ते एप्रिल 2020 पर्यंत तांदूळ व धान्याचा पुरवठा करण्याची मागणी झाली. त्यानुसार प्राथमिक शाळांना तांदूळ 71 हजार 995 किलो, मसुरडाळ 3 हजार 380 किलो,मुगडाळ 6 हजार 290 किलो, चणा वाटाणा 3 हजार 195 किलो मटकी 3 हजार 215 किलो, हळद 363 किलो, जिरे 327 किलो, मोहरी 350 किलो, तेल 2 हजार 825 किलो, मीठ 1 हजार 34किलो, चटणी 785 किलो इतका पोषण आहाराचा पुरवठा सालासार ट्रेनिंग कंपनीने शाळांना केल्याची माहिती प्रशासनाने दिली. मागील आठवड्यात वितरण करण्यात आलेले धान्य निकृष्ठ, तांदळाच्या वजनात घट असल्याचे समोर आले. हा प्रकार नेहमीचा आहे असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. त्यांच्या तक्रारीकडे केंद्रप्रमुख, संबधीत अधिका-यांनी नेहमी दुर्लक्ष केले. अखेर ग्रामस्थ कृष्णा बामणे, जितेंद्र जाधव यांनी मंगळवारी शालेय पोषण आहारातील मोठा गोलमाल समोर आणला. निकृष्ट धान्य तांदळाच्या वजनात घट पाहून गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी राग व्यक्त केला. हा धक्कादायक प्रकार आहे. सालासार ट्रेडिंग कंपनी ठेकेदार अनुपम कुलकर्णी यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन जाधव यांनी दिले. अशात वर्षानुवर्ष निकृष्ठ धान्य, वजनात लबाडी करणा-या संबधीत ठेकेदाराविरोधात पंचायत समिती प्रशासन नेमकी काय कारवाई करते, गंभीर प्रकाराची दखल जिल्हा परिषद पुरवठा विभाग दखल घेतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *