रोहा पंचायत समिती शिक्षण विभागाकडून निकृष्ट पोषण आहार पंचनाम्यात वेळकाढूपणा, विद्यार्थ्यांच्या आहारातून पुरवठादार , अधिकारी, शिक्षक यांचेच पोषण ? भाजपा, मनसेचा सवाल

Share Now

798 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे निकृष्ट व मुदतबाह्य, कमी वजनाच्या शालेय पोषण आहार पुरवठ्याचा पर्दाफाश ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर सलाम रायगडने मागील आठवड्यात केला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा युवा मोर्चाने या गंभीर विषयाची दखल घेत रोहा गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना धारेवर धरत पुरवठा दारावर गुन्हा दाखल करत याची सखोल चौकशी करावी अशी ठाम भूमिका घेत निवेदने दिली. त्यानंतर या विषयी तातडीने सर्व शाळांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी गट शिक्षण अधिकारी सादुराम बांगारे यांना दिले. यावर पुढे काय कारवाई याची चौकशी करण्यासाठी सोमवार 29 जुन रोजी मनसे उपजिल्हाध्यक्ष अमोल पेणकर व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग हे ग्रामस्थांच्यासह पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. मात्र येथे गेल्यावर गटविकास अधिकारी हे कौटुंबिक कारणास्तव रजेवर व गट शिक्षण अधिकारी हे शासकीय कामकाजासाठी नागोठणे येथे गेल्याचे समजले. त्यामुळे तालुक्यातील कोणत्या व किती शाळांचे पंचनामे झाले याची माहिती मिळु शकली नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या पोषण आहाराचे बिंग फुटल्यानंतर पुरवठा दाराचे पुतना मावशी प्रेम जागे होत आपण ते तातडीने बदलून देणार असे पत्रच पंचायत समिती रोहा कडे दिले आहे.यामुळे जर तालुक्यातील शाळांचे मधील निकृष्ट व मुदतबाह्य पोषण आहार बदलल्यास पंचनाम्यातुन काय सिद्ध होणार. आज पर्यंत या पोषण आहारातून पुरवठादार , अधिकारी व शिक्षकांचेच पोषण झाले असावे ? असा उपरोधिक सवाल मनसे व भाजपाने केला आहे. यामुळेच पंचानाम्यास दिरंगाई करून अधिकारी वर्ग कार्यालयातून पळ काढत आहेत असा आरोप केला आहे.

रोहा तालुक्यातील प्राथमिक शाळांचे मध्ये विद्यार्थ्यांचे पोषणाकरिता पुरवठा करण्यात येणारा आहार हा निकृष्ट व दर्जाहीन आहे अश्या तक्रारी पालकवर्ग गेली वर्षभर शिक्षकांचे पासून पंचायत समिती शिक्षण विभागाकडे करत होता.मात्र याकडे कोणीही गांभीर्याने न पाहता फक्त आपलेच यातून कसे पोषण होईल हे थातुरमातुर कारवाईची उत्तरे देत पालकवर्गाची बोलवण करत होते. अखेर मंगळवार 23 जुन रोजी पालकांनी शाळांमध्ये पुरवण्यात आलेल्या निकृष्ट, कमी वजनाच्या व मुदत बाह्य पोषण आहाराचा गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव व पत्रकारांचे समोर पर्दाफाश केला.त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा युवा मोर्चा या प्रश्नावर आक्रमक होत या प्रकरणाची सखोल चौकशी करत सालासार एजन्सी व रायगड जिल्ह्यातील पुरवठादार अनुपम कुलकर्णी यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर रोहा गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी पुरविण्यात आलेले साहित्य हे निकृष्ट आहे हे मान्य करत गटशिक्षण अधिकारी सादुराम बांगारे यांना सर्व शाळांचे मध्ये पंचनामा करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

सोमवार 29 जुन रोजी मनसे व भाजपाचे नेते पंचनाम्यांचे बद्दल माहिती घेण्यासाठी रोहा पंचायत समिती कार्यालयात धडकले. त्यावेळी अश्या गंभीर व महत्वपुर्ण विषयासंबंधी माहिती देण्यासाठी गटविकास अधिकारी वा अन्य कोणीही सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले.यावेळी भ्रमणध्वनी द्वारे गटविकास अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता कौटुंबिक कारणास्तव ते रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. तर गट शिक्षण अधिकारी सादुराम बांगारे हे शासकीय कामासाठी नागोठणे येथे गेल्याची माहिती दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी बांगारे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.तर पंचायत समिती प्रशासन अधिकारी यांनी गटविकास अधिकारी दुपारनंतर भेटतील असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. यामुळे तालुक्यातील लहानग्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी महत्वपूर्ण असलेल्या या विषयावर अधिकारी चालढकल करत असल्याचे प्रकर्षाने समोर आले. त्यामुळे या आहारातून आजवर यांचेच पोषण झाले असावे म्हणून हा वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप तक्रारदार पालक व भाजपा, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या विषयावर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *