जेएसडब्लू कंपनीतून धुरांचे लोट, नागरिकांमध्ये घबराहट, सोशल मीडियावर अफवांना उधाण

Share Now

599 Views

पेण (देवा पेरवी) बुधवारी सकाळी पेण तालुक्यात अचानक धुराचे लोट वातावरणात पसरल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. यावेळी सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवांनी अक्षरशः थैमान घातले होते.

पेण तालुक्यातील डोळवी येथील जेएसडब्लू कंपनीतुन अचानक निघत असलेल्या धुरांच्या लोटांमुळे पेण व अलिबाग तालुक्यात घबराट पसरली होती. समाज माध्यमांवर कंपनीत एखादी दुर्घटना घडल्याची चर्चा होत होती. त्याचप्रमाणे केमिकल गळती व शॉर्टसर्किटची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात येत होती. या संदर्भातील घटनेचे व्हिडिओ तसेच फोटो संपुर्ण जिल्हाभर समाज माध्यमावर फिरत होते. त्यामुळे पेण व अलिबाग तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेसंदर्भात पेण तहसीलदार अरुणा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जेएसडब्ल्यू कंपनीत घडलेल्या सदर घटनेला दुजोरा दिला. मात्र कंपनीत ब्रेक डाऊन झाल्यामुळे धूर पसरल्याचे सांगीतले.

जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही, बुधवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान जेएसडब्ल्यू डोलवी येथील प्लांटमध्ये कंपनीचे कोक ओव्हन हे युनिट आहे. त्या युनिटमध्ये इलेक्ट्रिक पावर ट्रिप झाली. त्या दरम्यान सदरहू प्लांट शटडाऊन झाला आणि कोक बनण्याची प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे कोकचे धूर चिमणीतून 10 ते 15 मिनिटे बाहेर पडला. हा विषारी वायू नाही. तसेच प्लांट पूर्ववत सुरु झाल्याची माहिती जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाकडून आत्माराम बेटकेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *