रोहा शहरात पुन्हा प्लॅस्टीकची दहशत, न. पा. ची कारवाई ढिम्म फळ भाजी विक्रेत्यांचा अडथळा जैसे थे

Share Now

723 Views

रोहा (प्रतिनिधी) निवडणूक आल्या की रोहा अष्टमी न.पा.कडून मुख्य रस्त्यालगत चक्काजाम करणाऱ्या फळ भाजी विक्रेत्यांना अक्षरशः मुभा मिळते हे नवे नाही . शहरातील सर्व रस्ते सुटसुटीत रहावे भाजी, फळ विक्रेते, गाडयांचा अडथळा कायम दूर व्हावा, सर्व व्यसायिकांना हक्काची जागा मिळावी यासाठी नेहमीच संघर्ष होतो. त्याच अडथळ्याच्या चर्चेतून भाजी, फळ विक्रेत्यांसाठी न.पा, प्रशासनाने अनेकदा हटाव मोहीम राबविली. त्यातून फळ भाजी विक्रेते रस्त्यावर येणार नाहीत, असेही ठोस आश्वासन दिले. मात्र निवडणूका आल्या की हीच मोहीम थंडावते, हे बजावून देखील रस्त्याच्याकडेला भाजी फळ विक्रेत्यांचा चक्काजाम होणार नाही असे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचे अक्षरशः हसे झाले. भाजी फळ विक्रेते सर्व रस्त्यांच्या कडेलाच ठाण मांडून बसले आहेत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या न.पा. प्रशासनाची प्लॅस्टीक विरोधी मोहीम सुध्दा थंडावल्याचे समोर आले. शहरात सर्वत्र पुन्हा एकदा प्लॅस्टीकची दहशत जाणवत आहे. फळ, भाजी विक्रेते, थंडा पेय, हॉटेल्स बहुतेक दुकानदार बिनधास्तपणे प्लॅस्टीक पिशव्यांचे सर्रास वापर करीत असल्याने न.पा.च्या प्रशासकीय निर्णयाला केराची टोपली मिळाली असेच खेदाने बोलले जात आहे.
रोहा अष्टमी नगरपरिषद आणि वाद हा विषय नवीन नाही. आधीच कुंडलिकेचे पात्र भराव प्रकरण, शहरातील भुयारी गटाराच्या नावाखाली धोकादायक रस्ते, वातावरण प्रचंड धुळीने नागरिक हैराण आहेत. सर्व गल्लीबोळातील रस्ते तोडून फोडून काढलेत. मातीचे ढिगारे, खड्डे स्वागत करीत आहेत. याच खड्ड्यात आतापर्यंत अनेकजण पडले. विद्यार्थी रडकुंडीला आलेत. गुरेढोरे पडल्याच्या घटना घडल्या. त्यातच पावसाळ्याच्या आधी रस्त्यांची कामे होणार नसल्याने स्थिती हाताबाहेर जाणार, नागरिक प्रचंड संतप्त होणार याचे संकेत आहे . याच न.पा . प्रशासनाच्या ढिम्म कारभाराने सुटसुटीत रस्ते, प्लॅस्टीक मोहीमेला हरताळ फासले गेले. प्रारंभी प्लॅस्टीक बंदी मोहीम कार्यक्षमतेने राबविली. मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी शासकीय अटीशर्ती व अंमलबजावणी घसा सुकेपर्यंत सर्वाना सांगितले. त्यातून सर्वांनाच वाटले, हमरस्त्याच्या कडेच्या हातगाडया हटल्या, प्लॅस्टीक मुक्त रोहा अष्टमी कायम होईल. मात्र हे सर्व क्षणापुरतेच ठरले. हातगाड्या कायम हटविण्याचे दिलेले आश्वासन निवडणूका आचारसंहितेच्या पूर्वसंधेलाच कागदात गुंडाळले. त्यापाठोपाठ प्लॅस्टीक मोहीमही प्रचंड थंडावली. आज सर्वत्र प्लॅस्टीकचा बोलबाला सुरु आहे. फळ भाजी विक्रते, हॉटेल, थंडपेयवाले बिनधास्त प्लॅस्टीक पिशव्या देत आहेत. अशात रोहा अष्टमी न. पा. चे कारभारी, प्रशासन प्रमुखाची बतावणीच ठरली हे स्पष्टपणे समोर आले आहे .
रोहा अष्टमी प्रशासन, लोकप्रतिनिधी विकासकामांच्या दर्जातून सतत टीकेचे धनी झाले. त्यांना लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे शहरातील सर्वच हमरस्ते सुटसुटीत ठेवण्याचे दिलेले आश्वासन नेहमीप्रमाणे पाळले नाही.
मुख्यतः मतपेटीच्या भितीतेच सर्वांवर दया दाखविली. त्यातून रस्ता सुटसुटीत, प्लॅस्टीक बंदी निर्णयाला हरताळ फासले गेल्याची पुन्हा नव्याने प्रचिती आली. आता निवडणुका संपल्या, त्यामुळे रस्त्याच्या कडेला हातगाड्या चक्काजाम हटविण्याचे धाडस नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण दाखवितील का ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, रस्ता सुटसुटीत करावे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेला सकल मराठा समाज आता कुठे आहे ? अशी विचारणा होत आहे, तर प्लॅस्टीक मोहिमेबाबत न.पा. प्रशासन आतातरी भानावर येतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.