रियल एचपी एजन्सीविरोधात ग्राहक आक्रामक, कारभार सुधारण्यासाठी ‘अल्टीमेटम’, रोहा सिटिझन फोरमचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Share Now

886 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहर व ग्रामीण भागात हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वतीने नेमण्यात आलेल्या एजन्सी मार्फत घरगुती गॅसचा पुरवठा होताना ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये रियल एचपी या एजन्सी व तिच्या संचालकाकडून ग्राहक विशेषता महिला वर्गाला नेहमी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांच्यामधून होत आहेत. या संचालकाच्या मनमानी व मस्तवाल कारभारामुळे सर्वच प्रकारचे ग्राहक हे त्रस्त झाले. रोहामध्ये नागरी समस्यांना रोहा सिटिझन फोरमच न्याय मिळवून देते असा विश्वास आता नागरिकांच्या निर्माण होत असल्यामुळे या सर्व तक्रारीवजा भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत ग्राहक नागरिक प्रचंड आक्रामक झाले. त्या सर्व तक्रारी फोरमकडे मांडल्या. गेली कित्येक दिवस नागरिकांना भेडसावणाऱ्या या सर्व समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांची फोरमचे अध्यक्ष नितीन परब व निमंत्रक आप्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. भेटीदरम्यान सिटिझन फोरमच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देत ग्राहकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या मांडल्या. यासोबतच रोहामधील जिल्हाधिकारी नियुक्त ग्राहक संरक्षण समिती सदस्य हे ग्राहकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून ते त्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे अश्या अश्या सदस्यांची नेमणूक रद्द करत जनतेचे प्रश्न जाणणारे नवीन सदस्यांची नेमणूक करावी अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी जेष्ठ पत्रकार मिलिंद आष्टीवकर, राजेंद्र जाधव,जितेंद्र जोशी, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे रोशन चाफेकर, हाजी कोठारी,प्रशांत देशमुख, अमोल देशमुख यांनी उपस्थित रहात रोहेकराना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.

रोहा शहरातील घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या दोन्ही एजन्सी मधून नेहमीच ग्राहकांना त्रासदायक सेवा होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. यामध्ये रियल एचपी या एजन्सी व तिच्या संचालकांचे कडून मिळणाऱ्या अनियमित सेवा व मस्तवाल वागणूक यामुळे सर्व सामान्य ग्राहक हा त्रस्त झाला आहे.कोरोना सारखी महामारी असो व घरगुती गॅस समस्या रोहा सिटिझन फोरम नेहमीच रोहेकराना चांगली सेवा कशी मिळेल याचा पाठपुरावा करत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून गॅस पुरवठ्या बाबत ग्राहकांनी आपल्या तक्रारी मांडल्यावर रोहा सिटिझन फोरम ने तात्काळ याची दखल घेतली. प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांची वेळ घेत या सर्व समस्या सविस्तर निवेदनाद्वारे त्यांच्या समोर मांडल्या.घरगुती गॅस पुरवठा,मुळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेणे ,जेष्ठ नागरिकांच्या सुविधा, उज्वला योजना लाभार्थी, विक्री,दुरुस्ती यासह एजन्सी मार्फत ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांची माहिती प्रांताधिकारी यांनी घेतली.

शुक्रवारी झालेल्या चर्चेला सतत वादग्रस्त असलेले रियल एच पी एजन्सी चे संचालक प्रकाश गायकवाड हे अनुपस्थितीत होते. त्यामुळे प्रकाश गायकवाड यांचे सह भारत पेट्रोलियम एजन्सी चे संचालक यांच्या सोबत एकत्र बैठक लावावी अशी मागणी फोरमच्या वतीने करण्यात आली.नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असणारे प्रांताधिकारी यांनी फोरमच्या ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशोत्सव संपल्यानंतर तातडीने हि बैठक घेण्यात येईल असे सांगितले. यासोबतच आजच्या बैठकीत एजन्सी संचालकांना आगामी काळात ग्राहकाभिमुकसेवा देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या सुचना त्यांनी तहसील पुरवठा शाखेतील कर्मचाऱ्यांना दिल्या.पुढील बैठकीत ग्राहक संरक्षण समिती सदस्य व ग्राहकांच्या तक्रारींची या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून यापुढे रोहा मधील घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होत ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यासाठी प्रयत्न आपल्या कडून होईल असे आश्वासन प्रांताधिकारी यांनी शेवटी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *