रोहा शहरालगत ग्रामीण भागात चायनीज सेंटर मिनि ‘बार ‘, उत्पादन शुल्क विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष , कोरोनाच्या काळात प्रशासन कारवाई का नाही करत ?

Share Now

667 Views

रोहा (महेंद्र मोरे) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाउन जाहीर होण्या आधीच राज्यातील परमीट रुम व दारू विक्री दुकाने 17 मार्चपासून पूर्णतः बंद केली.त्यानंतर राज्याची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी दारू विक्री दुकाने सुरु करण्यात आली. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेत आजही परमीट रुम, बार हे बंदच आहेत. एकीकडे असे असताना रोहा शहर वगळता लगतच्या ग्रामीण भागातील चायनीज सेंटर हे आता मिनी ‘बार’ झाले असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.दारुच्या दुकानांचे मधून दारू विकत घेत तळीराम बिनधास्तपणे या चायनीज सेंटर वर जात मद्यपान करत आहेत. येथील मद्यपिंची गर्दी पाहता कोरोना फक्त बार मध्येच एकत्र बसून मद्यपान केल्यावर होतोय का ? असाच प्रश्न निर्माण होत आहे. शासनाला कर देणारे हे बार बंद मात्र अनधिकृतपणे चालविले जाणारे चायनीज सेंटर मात्र बिनबोभाट सुरु आहेत. रात्रीच्या वेळी मद्यपिंचे अड्डे बनलेले चायनीज सेंटर रोहा उत्पादन शुल्क विभागाच्या ‘अर्थपूर्ण ‘ आशिर्वादाने दुर्लक्षीत तर केले जात नाहीत ना ? असा त्रस्त सवाल कोरोनाच्या काळात आपली काळजी घेणाऱ्या नागरिकांचे मधून प्रशासनाला केला जात आहे. चायनीज सेंटर चालक हे आपल कोणीही वाकड करणार नाही, आपली सर्वत्र सेटींग आहे, असे बि मद्यपान करणाऱ्याला सांगत बिनधास्त बसा असे सांगत आहेत.आज रोहा तालुक्यात प्रशासन माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवत आहे. मागील तीन चार दिवसांतील कमी होत जाणारी रुग्ण आकडेवारी पाहता या मोहिमेचा चांगला परिणाम दिसत आहे. मात्र असे असताना या चायनीज सेंटरच्या माध्यमातून पुन्हा शहर व तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरा लगतच्या गावांतील या अनावश्यक गर्दी करणाऱ्या व कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करणाऱ्या सेंटर वर प्रशासन कारवाई का करत नाही. वेळीच या सर्व अनधिकृतपणे चालणाऱ्या चायनीज सेंटर वर कारवाई करत कोरोना मुक्तिच्या उंबरठ्यावर आलेला रोहा तालुका शंभर टक्के कोरोना मुक्त करण्यासाठी या सर्व चायनीज सेंटर वर कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधी पुर्णतः लॉकडाउन व आता हळूहळू अनलॉक करत सर्व परिस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे.कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळे सामाजिक अंतर राखुनच याला आळा घालता येणार आहे. त्यादृष्टीने सर्व हॉटेल, मद्यपान गृह हे आजही बंद आहेत. या ठिकाणाहून ग्राहकांना फक्त पार्सल द्वारे खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. आज रोहा शहरातील सर्व बार, हॉटेल, चायनीज सेंटर यांच्या मधून फक्त पार्सल सेवा देण्यात येत आहे. या सर्व व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असले तरी शासनाचे नियम ते पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र शहरा लगतच्या रोहा रेवदंडा, रोहा नागोठणे, कोलाड या मार्गावरील चायनीज सेंटर हे सुरु असलेले दिसतात.मात्र येथे फक्त खाद्यपदार्थ न देता या ठिकाणचे चालक नागरिकांना मद्यपान करण्याची परवानगी देत आहेत. संध्याकाळ झाली कि तळीरामाचे घोळके दारुच्या दुकानांतून दारू घेउन या ठिकाणी जमा होतात.या मुळे सामाजिक अशांतता तर निर्माण होतेच या सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण होत आहे.

कोरोनाच्या काळात स्वच्छता राखणे,आरोग्याला हानिकारक होईल असे पदार्थ न खाणे, सोशल डिस्टेंसिंग पाळणे असे आवाहन वारंवार करण्यात येते. मात्र रात्रीच्या वेळी गर्दीने फुलून गेलेले हे सर्व चायनीज सेंटर पाहिले असता हे सर्व नियम यांच्या साठी नसावेत याच आविर्भावात येथील मालक व मद्यपि असतात. अवैधरीत्या मद्यपान करणे व अन्य गोष्टींवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. मात्र रोहा उत्पादन शुल्क विभाग या सर्व परिस्थिवर कधीही कारवाई करताना दिसत नाही. येथील अधिकारी वर्गाकडून यासर्व परिस्थिती बाबत विचारणा करत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी फोन उचलत नाहीत. यामुळे नक्की हा विभाग काय कारवाई करतोय ते समजू शकत नाही. मात्र यामुळे अनधिकृतपणे चायनीज सेंटर चालविणाऱ्यांना कोरोनाच्या काळात सुगीचे दिवस आल्याचे येथील गर्दिवरुन दिसत आहे. स्वतः मालकच दारू पिण्याची परवानगी देत असल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील युवक व अन्य नागरिक व्यसनाधीन तर होतातच यासोबत ते आपल्या सोबत कोरोनाही घेउुन आपल्या घरी जात आहेत. मागील दोन महिन्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निरिक्षक, वैद्यकीय अधिक्षिका या सर्वांच्या मेहनतीने आता आटोक्यात येत आहे. मात्र हे चायनीज सेंटर जर असेच मद्यपिंचे अड्डे बनून राहिले तर कोरोना पुन्हा डोके वर काढु शकतो.शहरा लगतच्या व ग्रामीण भागातील चायनीज सेंटर वरील वाढती अनावश्यक गर्दी रोखण्याच्या दृष्टीने संबंधीत ग्रामपंचायतीने ही लक्ष देण गरजेचे आहे. तरच आपण सर्व कोरोनाला हद्दपार करू शकतो. आता रोहा तालुका पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या उपाययोजनांमुळे कोरोना मुक्तिकडे वाटचाल करु लागला आहे. त्यामूळे या सर्व चायनीज सेंटरवर कोरोनाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *