श्रीवर्धन (आनंद जोशीं) गेल्या सहा-सात महिन्यांपासून जगभरांतील अनेक देशांत कोरोना महामारीने उग्र रुप धारण केल्यामुळे देशोदेशींचे अर्थकारण, समाजकारण इतकेच नव्हे तर काही ठिकाणचे राजकारणही बदलून गेल्याचे दिसते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुकारण्यात आलेल्या लाॅक डाऊनमुळे कितीतरी देशांतील अर्थ व्यवस्थाही पार ढासळून गेली असून आर्थिक मंदीला तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या अगदी प्रथम शिरकावापासूनच भारत सरकारने आणि राज्य सरकारांनी कमीत कमी नागरिकांना याची हानी पोहोचावी यासाठी अनेक शर्थीच्या उपाययोजना केल्यामुळेच आज भारतात तरी मृत्युदर दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्याचे चित्र
दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनानेही कोरोनाशी दोन हात करुन नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने अनेक
उपाययोजना केल्यामुळेच आज कोरोनाचा प्रभाव अनेक ठिकाणी कमी होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्रीवर्धन तालुका तर कोरोनाला पुरता हद्दपार
करण्याच्या दिशेनेच वाटचाल करीत आहे असे म्हटल्यास
अतिशयोक्तीचे ठरणार नाही.तालुक्याचा कोरोना संबंधीचा दररोजचा अहवाल पाहता असे दिसून येते की
साधारणपण ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या दिवसें –
दिवस घटत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये तालुक्या
तील वाकळघर येथील ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली
असता तब्बल 22 रुग्ण पाॅझिटिव्ह मिळाले होते.परंतु याने खचून न जाता या सर्वांनी कोरोना निर्मूलनासाठी
अनेक उपाययोजना केल्यामुळे हे सर्व रुग्ण खडखडीत
बरे झाले आहेत.
दि.24 ऑक्टोबर पर्यंतची तालुक्याची आकडेवारी पाहता असे दिसून येते की, तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 404 इतकी असून उपचार सुरु असलेल्या बाधितांची संख्या फक्त 03 आहे.तसेच 20 ऑक्टोबर पर्यंतची तालुक्याची एकूण मृत्युसंख्या 20 होती.त्यात दि.21 रोजी त्यात एकाने भर पडून ती आता 21 आहे. तर बरे होऊन डिस्चार्ज झालेल्या व्यक्तींची संख्या 380 आहे. 15 ऑक्टोबर नंतर तर ब-याचदा रुग्णसंख्या निरंक दिसते.हा सर्व शासन,प्रशासन, नगर परिषद, ग्रामपंचायती इ. सर्वच घटकांनी कोरोना प्रादुर्भाव हटविण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांचाच परिपाक आहे.तसेच नागरिक, व्यापारी या सा-यांनी दिलेली बहुमोल साथही नाकारून चालणार नाही. यापुढेही सर्व घटकांचे असेच प्रयत्न जोमाने सुरु राहिले तर श्रीवर्धन तालुक्यातून कोरोना हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही हे स्पष्ट आहे.