असंख्य प्राथमिक शाळा शेवटच्या घटकेत, इतिहास जमा होणार ? मंदिरे ‘पॉश’, शाळा विदीर्ण, भयान वास्तव समोर

Share Now

566 Views

रोहा (राजेंद्र जाधव) देश, राज्यातील अनेक दिग्गज गाव, वाडीपाड्यातील शाळेत शिकले. विविध क्षेत्रात नावलौकिक कमविले. आता त्याच प्राथमिक शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत. प्रत्येक पालकांना आपले पाल्य खूप शिकावे, चांगल्या विद्यालयात जावे. इंग्रजी भाषेचे ज्ञान घ्यावे, याच हेतूने शहराच्या आजूबाजूच्या मुलांनी इंग्रजी खाजगी शाळेत गर्दी केली. याचा परिणाम गावातील प्राथमिक शाळा ओस पडल्यावर झाले. दुसरीकडे सरकार लाखो रुपये प्राथमिक शिक्षणावर खर्च करीत आहे, पण शाळेची गुणवत्ता बेदखल होऊ लागली. शाळेतील मुले सुमार दिसू लागले आणि नंतर उर्वरीत अनेक मुलांनाही खाजगी शाळेत भर्ती केले. मग काय ? शाळा दोन, मुले दोन, शिक्षक दोन असून शिकविल कोण ? असे चित्र अधोरेखित झाले आहे, अखेर आधीच मोडकळीस आलेल्या अनेक प्राथमिक शाळा अक्षरशः इतिहास जमा होण्याच्या तयारीत आहेत, हे कोणी नाकारु शकत नाही. असंख्य शाळा मोडून पडल्या, काही पडण्याच्या रांगेत आहेत, शाळेसमोरील पूर्वी दिसलेला बगीचा उदध्वस्त माळरान झाले, त्यामुळे प्राथमिक शाळा खरोखरच इतिहास जमा होणार ? असेच सद्याचे दृश्य आहे. दरम्यान, प्रत्येक गावात मंदिरे पॉश आहेत, काही गावात दोन तीन मंदिरे डौलाने धर्माचे अधिष्ठान सांगतात, त्याच गावांतील शाळांची अवस्था विदीर्ण आहे, हे भयान वास्तव समोर आल्याने राजकारणी, सृजन समाजाचे काहीतरी चुकतंय असेच खेदाने बोलावे लागत आहे.

राज्य, जिल्ह्यातील गाव ठिकाणच्या प्राथमिक शाळांचा दर्जा घसरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक शाळांच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती. याउलट प्राथमिक शाळा, शिक्षकांवर सरकार दरवर्षी लाखो रुपये खर्च करतो. त्यातून गुणवत्ता लाभ आजकाल मिळत नाही. एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या गुणवत्ता, शाळांच्या इमारती टोलेजंग आहे. मात्र शिक्षित आधुनिक वैचारिक शिक्षकांना तुटपुंज पगार दिले जाते. तर प्राथमिक शिक्षकांना मोठे पगार आहेत, पण गुणवत्ता नाही. शाळांची अवस्था भयानक आहे. प्राथमिक शाळांची गुणवत्ता घसरल्याने पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वळला. मुले सर्वच पातळीवर हुशार होत आहेत. गावच्या प्राथमिक शाळेत आता आदिवासी, ठाकूर व अन्य अपेक्षीत समाजाची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भवितव्याची चिंता ना शासनाला ना शिक्षकांना याच घडामोडीत आधी शाळेतील विद्यार्थ्यांची गळती सुरु झाली. दुर्गम शाळेत दोनपाच विद्यार्थीही दिसत नाही. तरीही काही मोजक्या शाळा आदर्श शिक्षकांमुळे नावारूपाला आल्या हे असतानाच शेकडो शाळा आज शेवटच्या घटकेत आहेत, शाळांची योग्य दुरूस्ती नाही. उर्वरीत काही शाळांना वादळाचा फटका बसला. त्याही मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती नसल्याने गावाला शोभा आणणाऱ्या वेशीतील मंदिर शाळांपैकी शाळा गावांची मानसिकता सांगत आहे, हेच धाडसाने नमूद करावे लागत आहे.

सरकाचे शिक्षण धोरण कायम गोंधळाचे राहिले आहे. खाजगी इंग्रजी शाळांवर कायद्याने अंकुश नाही. उलट गावांतील सरकारी शाळांकडे गांभीर्याने लक्ष नाही. त्यामुळे आता प्राथमिक शाळात शिक्षण घेत असलेल्या गरीबांच्या मुलांचे भवितव्य सरकार अंधारात ठेवत आहे. दुर्गम भागांतील शाळेत शिक्षक उशिरा जाणे, दांड्या मारणे अशाही अनेक तक्रारी आहेत. त्याचा फटका उरलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीवर होत आहे. अनेक शाळा गळक्या आहेत, भिंतींना तडे गेलेत. छप्पर जुनेच कैलारु आहे. त्यातील अनेक शाळा धोकादायक झाल्याने बंद ठेवण्यात आल्या. मुलांना वैज्ञानिक, डॉक्टर्स, वकील, सृजाण नागरिक करण्यासाठी शिक्षण दर्जेदार हवे, याचाच विसर शासन,सरकारच्या कारभाऱ्यांना पडला. समाज मंदिराच्या नावाखाली जिल्ह्यातील अनेक गावांत मंदिरांचे कळस आकाशाला गवसणी घालू लागले. मात्र त्याच गावांतील शाळा जमिनीला नतमस्तक होण्याच्या स्थितीत आहेत. याची जाणीव राज्यकर्त्यांना कधी येणार, आता प्राथमिक शाळा, दर्जेदार शिक्षणाची उभारणी करणार की शाळा इतिहास जमा होणार ? असाच जाणिवेचा सवाल आहे. दुसरीकडे अनेक गावांतील मंदिरे गावांची धार्मिक ओळख सांगत आहेत. पण ज्ञानाची ओळख सांगणाऱ्या शाळा वार्धक्याने घेरल्या आहेत हे शोभनीय नक्कीच नाही, अशी व्यापक भावना सृजाण समाजात आहे. रायगड जिल्हा मुख्यतः रोहा तालुक्यातील अनेक जीर्ण शाळांची दुरुस्ती होते का, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर जिल्हा परिषद कधीतरी प्रामाणिक प्रयत्न करेल ? याच अपेक्षेत प्राथमिक शाळांना भवितव्य काय ? हे येणारे काळ सांगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *