धाटाव एमआयडीसी जागेलाही अतिक्रमणाचा ‘विळखा’, बांधकाम व एमआयडीसी प्रशासन कारवाई कधी करणार ? रेल्वे धाब्याचे गुपीत कमालीचे चर्चेत

Share Now

794 Views

रोहा(राजेंद्र जाधव) रोहा कोलाड रस्त्याचे रूंदीकरण प्रस्तावित आहे. कोलाड ते कोकबन रस्त्याच्या कामाला अद्याप प्रारंभ नाही. चणेरा ते कोलाड रस्ता पूर्णतः खड्यात गेला. प्रवाश्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असल्याने आधीच वैतागलेत. त्यातच रोहा कोलाड रस्त्याच्या धाटाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता कडेला प्रचंड अतिक्रमण झाले असून प्रसिद्ध रेल्वे धाब्याने अतिक्रमणाचे सर्व उच्चांक गाठले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला असंख्य गाळे, शेजारी गाळ्यांच्या मागे अलिबाबाच्या गुहेसारखी मागून पाच सहा भाड्याच्या खोल्या दिसून आल्याने रेल्वे धाब्याचे गुपित आता अधिक चर्चेला आले. आधी बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण असतानाच धाटाव एमआयडीसीच्या रासायनिक सांडपाणी वाहक वाहिनीच्या जागेलाही अतिक्रमण गाळ्यांचा विळखा पडल्याचे समोर आल्याने चाललंय काय ? असे बोलले जात आहे. दरम्यान रेल्वे धाबा मालकाने आधी बांधकाम विभागाच्या रस्ता साईडपट्टीवर अतिक्रमण केले, तर विरूध्द दिशेने एमआयडीसीच्या सांडपाणी वाहक मालकी जागेवर मोठे अतिक्रमण केल्याने आता एमआयडीसी तरी कारवाई करते का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाटाव ग्रामपंचायत हद्दीतील रोहा कोलाड रस्त्याच्या कडेला अतिक्रमण आहे. पोटपाण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांना आजतागायत सांभाळले. त्याबाबत सामाजिक जाणिवेतून तक्रारी झाल्या नाहीत. मात्र हद्दीतील एका व्यक्तीने अतिक्रमणाचे सर्वच निकष तोडले. रोहा डायकेम कंपनीकडे जाणाऱ्या वळणावर आधी दोनतीन झोपडी गाळे व्यवसायासाठी तयार केले. त्यानंतर हातपाय पसरी म्हणत चक्क आठदहा खोल्या रस्त्याच्या शेजारील एमआयडीसी जागेवर खोल्या बांधल्या.खोल्यांच्या शेजारी, खाली रासायनिक सांडपाणी, रोहा नगरपालिकेला जाणारी मोठमोठी जलवाहिनी आहे. बांधलेल्या खोल्यांत अनेक भाडोत्री रहात आहेत. तब्बल तीसचाळीस फुटापर्यंत गाळे, खोल्या दिसून आल्याने रेल्वे धाबा नामकरण झाले. त्यावर आता रेल्वे धाब्यात लपलय काय ? रस्ता समोरून अनेक गाळे झाकल्याने आत काय आहे, असा सवाल आता उपस्थित झाला. दुसरीकडे बांधकाम विभाग व एमआयडीसी प्रशासन रस्त्याच्या कडेला असलेले असंख्य अनधिकृत बांधकामे आतातरी हटवतील का?याबाबत विचारणा होत आहे.

कोलाड ते कोकबन रस्त्याचे रूंदीकरण लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम संबंधीत विभाग कधी घेणार, अनेक गाळे, बांधकामे रस्ता कामात अडथळे ठरत आहेत. आता तर एमआयडीसीच्या सांडपाणी वाहक वाहिनीच्या जागेवरही काही महाभागांनी मोठे अतिक्रमण केले. खोल्या बांधल्या, ते सर्व बांधकाम हटवून रस्त्याला मोकळा श्वास घेउु द्यावा, यासाठी आपण लवकरच बांधकाम विभाग एमआयडीसी प्रशासन अधिकारी यांच्याशी चर्चा करु, अतिक्रमण हटविण्याची मोहीम उघडू अशी प्रतिक्रिया रोहा सीटिझन फोरमचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी दिली. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला अधिक बळ मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त झाली. याउलट धाटाव ग्रामपंचायत प्रशासनानेही रेल्वे धाबा यांसह अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करावी अशी मागणी झाली आहे. दरम्यान रोहा कोलाड रस्त्यालगत असलेल्या मुख्यतः ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या कडेला, तर एमआयडीसीच्या जागेवरही प्रचंड अतिक्रमण धोकादायक बनल्याने संबंधीत दोन्ही विभाग कारवाई करणाई करणार का ? याची प्रतिक्षा कायम आहे. तर एमआयडीसी विभागाचे अभियंता मालोजी निंबाळकर यांची प्रतिक्रिया तुर्तास उपलब्ध झाली नाही, ते काय भूमिका घेतात? हे लवकरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *