धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांना वेठीस धरण्याच्या प्रकारात पुन्हा वाढ, कामगारांत स्पष्ट नाराजी

Share Now

787 Views

रोहा (शशिकांत मोरे) धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांना व्यक्तिगत स्वार्थापोटी वेठीस धरण्याचे प्रकार पुन्हा वाढीस लागले. दूषित पाणी, वायू याच्या नावाखाली काही राजकीय कार्यकर्ते नेत्याच्या नेतृत्वाखाली कंपनीला वेठीस धरण्यात येत असल्याची घटना आठवडापूर्वीं घडली, या प्रकाराने सर्वच कंपन्यांचे खुद्द कामगार व व्यवस्थापकीय अधिकारी वर्ग अक्षरशः हैराण झाल्याचे दिसते. दुसरीकडे अनेक कंपन्या कोरोना काळात नाजूक आहेत, तर राजकीय प्रदूषणाला कंटाळून अनेक कंपन्या गुजरातच्या दिशेने मार्ग धरल्याने दंडेलशाही राजकीय पदाधिकारी यांना भान येणार कधी ? असा सवाल उपस्थित करीत कामगारांनी राजकीय हल्लाबोल वागण्यावर स्पष्ठ नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी घडलेल्या अशाच एका प्रकारामुळे संबंधितांबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, संबध रोहेकर नागरिकांनी नकळत तीव्र संतापही व्यक्त केले. असेच प्रकार यापुढे सुरू राहिले तर यहा कल क्या होगा किसने जाना असेच म्हणण्याची वेळ येते की काय ? असा प्रश्न कामगार वर्गासह युवा पिढीसमोर पडला आहे.

१९७६ साली स्थापन झालेल्या धाटाव एमआयडीसीत जवळ जवळ ४५ वर्षे पूर्ण होत आली आहेत. सुदर्शन केमिकल, एक्सेल, धरमसी मोरारजी, निरलॉन, राठी डाय केम यासह इतर कंपन्यानी आपली उत्पादन प्रक्रिया सुरू केल्यानंतर या परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला.अनेकांचे संसार बऱ्यापैकी सुरू झाले. तर रोजगार मिळाल्या मुळे अनेक कामगारांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आता उच्च पदावर कार्यरत आहेत.तर आर्थिक उलाढाल वाढल्याने बाजारपेठेसह कोलाड व इतर परिसरात सोनियाचे दिवस पहावयास मिळाले हे कदापि नाकारता येणार नाही.एकंदरीत रोह्याच्या सर्वांगीण विकासात धाटाव औद्योगिक वसाहत एक पर्वणीच ठरली.

युनिकेम लॅबोरेटरी लिमिटेड या औषधे निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका राजकीय पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी ठीय्या आंदोलन करून व्यवस्थापना विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हल्लाबोल केला.तर कारखान्यातील संबंधित व्यवस्थापकांशी सुद्धा हुज्जत घालण्याचा प्रकार घडवून आणला.रासायनिक सांडपाणी प्रकरणी या मंडळींनी कंपनीच्या समोर केलेल्या या प्रकारामुळे परिसरात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कंपनी बंद करण्याच्या भूमिकेवर आलेल्या या कार्यकर्त्यांमुळे अखेर कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसह कामावर असणाऱ्या कामगार वर्गाला या प्रकरणी लक्ष घालून हा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यानंतर कामगार विरुद्ध कामगार असाही आमने सामने काहीसा प्रकार घडला. संबंधित व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्याला नमवलं हा आविर्भाव समजून एका राजकीय पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आपली दंडेलशाही अवलंबित दरम्यान घडविलेला प्रकार संबंधित कंपनीच्या प्रगतीला नक्कीच खीळ घालणारा म्हणावा लागेल. दरम्यान संबंधितांनी सदर प्रकाराला दिलेले ठिया आंदोलन हे गोंडस नाव नक्की ठिय्या आंदोलन की हल्लाबोल याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एखादी घटना घडली की त्यावर शासकीय पातळीवर कारवाई करण्याचा मार्ग असतो मात्र तसे न होता भावनिकतेच्या आविर्भावात जाऊन कायदा हातात घेणे आणि हल्लाबोल करणे याला म्हणावे तरी काय ? असाही प्रश्न समोर येत आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी अशाच वारंवार घडलेल्या काही प्रकारांमुळे नव नवीन येणारे उद्योग थांबले तर सुरू असलेले काही कारखाने तग धरून होते त्यांनीही अशा वाढत्या प्रवृत्तीला कंटाळून गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा इतर राज्यात वळवला.यामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीची पिछेहाट झालीच मात्र यातून रोह्यात होणाऱ्या उलाढालीवरही न कळत परीणाम झालाच.नव नवीन कारखाने येतील संख्या वाढेल आणि पुन्हा औद्योगिक वसाहत भरारी घेईल असे स्वप्न अनेकांनी पाहिले असताना आता बहुतांशी कारखाने बंद पडत चालल्याने पूर्वीपेक्षा कारखान्यांची संख्या मात्र निम्यावर आली आहे. कधी स्वप्नात सुद्धा पाहिले नसेल असा पेप्सिको इंडिया लिमिटेड कारखाना मालक वर्गाने तडकाफडकी बंद केला. यामुळे १५० जणाच्या रोजगारावर गदा आलीच परिणामतः मुलांचे शिक्षण,यासह इतर मूलभूत घटकांवर सुद्धा चांगलाच परिणाम झाला. सध्या कोरोनाच्या महामारीत देशाची विशेषतः महाराष्ट्राची आर्थिक अवस्था बिकट झाली असतानाही याच कारखान्यामुळे सध्या कामगारांची रोजीरोटी सुरू आहे.अशा डळमळीत अवस्थेतून कारखानदार सुद्धा सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र कारखाना जगला तर कामगार जगेल हे केवळ बोलण्यासाठी सहज असलेले चार शब्द कारखानदारांना वेठीस धरणारी प्रवृत्ती कारखाने जिवंत ठेवण्यासाठी अनुकरणात का आणत नाहीत? हेच खेदाने बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *