रोह्यात भंगार व्यावसायिकांकडून सामाजिक आरोग्य धोक्यात, दिवसरात्र भंगारची जाळपोळ, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, न. प. कारवाई कधी करणार ?

Share Now

483 Views

रोहा (महेंद्र मोरे) कुंडलिका नदीकिनारी असलेल्या भंगार व्यावसायिकांना प्रचंड जन विरोधानंतर अखेर आपले बस्तान तेथून हलवावे लागले होते. त्यानंतर हे सर्व व्यवसायिक रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीमध्येच अष्टमी भागात खाजगी जागेत भाडेतत्वावर स्थलांतरीत झाले. मात्र येथे आल्यानंतर ही कुंडलिका नदिपात्रालगत त्यांच्या कडून प्रदूषण नियमांना फासण्यात येणारी हरताळ सुरु असून सामाजिक आरोग्य आजही धोक्यात असल्याचे दिसत आहे.औद्योगिक वसाहती मधील रसायन युक्त, लोखंडी व प्लास्टीक साधनांची दिवसरात्र जाळपोळ करून त्यातून त्यांना आवश्यक तो माल काढण्यात येते. मात्र असे करताना मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त धूर निर्माण होत असल्याने हा संपूर्ण भाग प्रदूषित होत आहे.यामुळे अष्टमी, रेल्वे वसाहत व सी डी देशमुख कॉलेजलगतच्या नवीन वसाहती मधील नागरिकांना या सर्व मानवी प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. आधीच जे एस डब्ल्यू कंपनीची लोखंडी भुकटी त्यामध्ये या भंगारवाल्यांचे प्रदूषण यामुळे येथील नागरिकांना प्रदूषित श्वास घ्यावा लागत आहे. रोहा नगरपरिषद या आधीही या सर्व भंगार व्यवसायिकांची पाठराखण करत होती, तोच कित्ता आजही गिरविला जात असल्याने भंगारवाल्यांच्या मुजोर वर्तनावरुन दिसत आहे. खाजगी जागा मालकांना भरभक्कम भाडे देत, प्रदूषण नियमांची पायमल्ली होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या सर्व भंगार व्यावसायिकांवर रोहा अष्टमी नगरपरिषद कारवाई कधी करणार ? असा सवाल येथील वाढत्या प्रदुषणामुळे त्रस्त नागरिकांचेमधून विचारण्यात येत आहे.

रोहा शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या कुंडलिका नदीकाठावर भंगार माफियांनी मागील कित्येक वर्षे आपले बस्तान बसविले होते.यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्यावर दुष्परिणाम होत दिवसेंदिवस कुंडलिकाही मैली होत होती.मात्र भंगार माफिया हम किसीसे नही डरेंगे, याच मस्तवाल भुमीकेत होते. अखेर रोहा मधील पत्रकार व सामाजिक संघटना, पर्यावरण प्रेमी नागरिकांनी एकजूट करत कुंडलिका तिरावरुन भंगार माफिया हटवा व कुंडलिकेचे पावित्र्य राखा असा नारा देत नगरपरिषद प्रशासनाला जागे करत होते. रोहेकरांच्या या सामाजिक हीत जपणाऱ्या भावनेची दखल तत्कालीन नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांनी घेत सर्व भंगार व्यावसायिकांना शहरातून हद्दपार करण्याची कारवाई केली. त्यामुळे कुंडलिका नदीने मोकळा श्वास घेतला व नागरिकांना भंगार मुक्त कुंडलिका पात्राचे सुंदर चित्र पहावयास मिळाले. यानंतर काही काळ हे भंगार व्यावसायिक शांत होते.काही दिवस गेल्यानंतर रोहा नागोठणे मार्गालगत पेट्रोल पंप, सी डी देशमुख कॉलेज परिसर व आता नव्याने रेल्वे रनिंग रुम समोर खाजगी जागा भाडेतत्वावर घेत भंगार व्यावसायिकांनी आपले बस्तान पुन्हा बसविले.शहरातील व लगतच्या गावखेड्यातील नागरी वस्ती मधून भंगार वस्तू खरेदी करून त्या विकणे हा यांचा मुख्य व्यवसाय फक्त दाखविण्यासाठी असतो असे येथील एकूण परिस्थिती वरुन दिसत आहे.धाटाव औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांचे मध्ये वापरण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणल्या जात असल्याचे दिसत आहे. यामधील काही केमिकल युक्त वस्तू या याच ठिकाणी स्वच्छ केल्या जात आहेत. तर केमिकलचा थर जमा झालेले प्लॅस्टिक व लोखंडी सामान हे जाळून त्यातील आवश्यक ते घटक जमा केले जातात.अनावश्यक असलेले घटक हे उघड्यावर ठेवले जातात. पावसाळ्यात या सर्व भागात पुराचे पाणी येत असल्याने विनासायास हे सर्व घातक व कंपन्याना विल्हेवाट लावण्यासाठी खर्चिक असलेल्या वस्तू नदी मार्गे समुद्रात जाऊन मिळण्यास मदत होते. यातील प्लॅस्टिक,लोखंडी व काचेच्या वस्तू या लगतच्या शेतजमिनीत जात शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहेत.या भागात पेट्रोल पंप, घरगुती गॅस गोडाउन, रेल्वे स्टेशन, यासोबतच लगतच नागरी वस्ती असतानाही राजरोसपणा या भंगार वाल्यांचे कडून कारखान्यातील जमा केलेले साहित्य गॅस कटरने कापण्याचे काम करण्यात येते. जर यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण सुरक्षा नियमांचे अंतर्गत नागरी वस्ती मध्ये कोणताही कचरा व अन्य वस्तू जाळु नये असे नियम आहेत. जर या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई करण्याचा अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आला आहे.असे असतानाही हे सर्व भंगार व्यावसायिक राजरोसपणे हे सर्व विषारी पदार्थ जाळून प्रदूषण करत आहेत. मात्र आजपर्यंत त्यांच्यावर कोणत्याही कारवाई होताना दिसत नाही.या सर्व भंगार व्यावसायांच्या मुळे या भागात प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळच्या वेळी या भागात फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांना हवेतील रबर व प्लॅस्टिक मिश्रीत हवेतच श्वास घ्यावा लागतो. हिवाळ्याच्या दिवसात तर थंडीच्या नावाखाली या भंगार व्यावसायिकांना रान मोकळेच भेटत आहे. या सर्व प्रकारा मुळे येथील हवा तर प्रदूषित होत आहेच, यासोबतच नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. याची दखल घेत या सर्व भंगार व्यावसायिकांचे वर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांचे मधून पुढे येत आहे.रोहा शहर स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत असल्याने? आता या प्रदुषणकारी व सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या भंगार व्यवसायिकांवर रोहा नगरपरिषद प्रशासन कधी कारवाई करेल याकडे येथील सर्व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *