पेण चिमुकली अत्याचार प्रकरण, राज्य शासनाच्यावतीने उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Share Now

358 Views

पेण (देवा पेरवी) पेण येथील 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला कठोर शासन होण्याकरिता सदर खटला राज्य शासनाच्या वतीने फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पेण येथे दिली. शंभूराज देसाई यांनी पेण येथे पिडीत कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांत अधिकारी इनामदार, तहसीलदार अरुणा जाधव, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी व पोलीसवर्ग उपस्थित होते.

यावेळी शंभूराज देसाई यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना शासनाच्या मनोधैर्य योजना व दक्षता समितीच्या माध्यमातून तातडीने मदत करण्यात येईल असे जाहीर केले. सदर पीडित कुटुंबीयांच्या झोपडीला दरवाजा नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने सदर कृत्य केल्याने या आदिवासी वाडीवरील आदिवासींना शासनाच्या वतीने घरकुल व इतर विविध योजनांचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे देसाई यांनी सांगितले. राज्यात खून, दरोडे व गुन्हेगारी वाढत असल्याची टीका विरोधकांकडून होत असल्याने गृह विभागाच्यावतीने राज्यभरात गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांची रात्री व दिवसाची गस्त वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चिमुकलीसाठी 100 टक्के पेण बंद

चिमुकलीवर झालेल्या अन्याया विरोधात संतप्त झालेल्या पेणच्या जनतेनी एक दिवसाचा बंद पाळावा असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे, आदिवासी आदीम कातकरी संघटनेच्या वैशाली पाटील व समस्त आदिवासी समाज यांच्यातर्फेे करण्यात आले होते, त्यानुसार आज गुरुवार रोजी पेण 100% बंद ठेवण्यात आले होते. पेणच्या नागरिकांनी सदर आरोपी आदेश पाटील याला फाशी होण्याकरिता पेणच्या मुख्य रस्त्यांवरून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. सदर मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *