पेण येथील चिकन महोत्सवाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पुढाकार

Share Now

111 Views

पेण (देवा पेरवी) गेली वर्षभर महाराष्ट्रासह संपूर्ण जगात कोरोना या रोगाने थैमान घातले असून अनेक व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी नव्याने आलेल्या बर्ड फ्लूच्या भीतीने अनेक खवय्यांनी चिकन खाने टाळले होते. त्याचा विपरीत परिणाम पोल्ट्री व्यवसायावरती झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याकरिता रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या पुढाकाराने पेण येथे शुक्रवारी मोफत चिकन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलला पेण तालुक्यातील अधिकारी, पोल्ट्री व्यावसायिक परिवार व नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सदर फेस्टिवलमध्ये बनविलेले चिकन लॉलीपॉप, फ्राय चिकन, चिकन लेगपिस, चिकन बिर्याणी व अंड्यांच्या विविध पदार्थांवर खवय्यांनी चांगलाच ताव मारला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पेण नगरपालिका मुख्यधिकारी अर्चना दिवे यांच्या हस्ते झाले असून, माजी आमदार धैर्यशील पाटील, राजिप सभापती डी.बी.पाटील, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, डॉ.मस्के, डॉ.अर्ले, हरीश बेकावडे, जिल्हा अध्यक्ष दिनेश खामकर, उपाध्यक्ष विलास साळवी, खजिनदार मनोज दासगावकर, सचिव दीपक पाटील, माहिती अधिकारी सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

बर्ड फ्लू हा रोग बंदिस्त पोल्ट्री मधील बॉयलर कोंबड्यांना होत नसल्याचा दावा पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ.मस्के यांनी मार्गदर्शन करताना केला. तसेच 70 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या वर व्यवस्थित शिजवलेले चिकन मधील बर्ड फ्लूचे विषाणू 3 सेकंदात मरतात व सदर पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे नागरिकांनी मनसोक्तपणे बॉयलर कोंबडी पासून बनलेले पदार्थ खाण्याचे आवाहन डॉ.अर्ले यांच्याकडून करण्यात आले.

चिकन पासून बनलेले विविध पदार्थांची मोफत मेजवानी असल्याने या चिकन फेस्टिवलला पेण तालुक्यातील शेकडो तरुण व नागरिक उपस्थित राहून चिकनचा आस्वाद घेतला. या फेस्टिवल मुळे नागरिकांच्या मनातील बर्ड फ्लूची भीती निघून गेली असल्याची प्रतिक्रिया रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी यांनी दिली. या कार्यक्रमासाठी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या संचालकांनी विशेष मेहनत घेतली आहे. चिकन फेस्टिवलला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर कोंबड्यांच्या व्यवसायाला तेजी येईल असा विश्वास पोल्ट्री व्यावसायिकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *