पेणच्या वासंती स्टील दुकानातून जेएसडब्लू कंपनीचे बनावट स्टील पत्रे ताब्यात, मालक कपिल जैन विरोधात पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, कपिल जैन फरार

Share Now

433 Views

पेण (प्रतिनिधी) पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीचे बनावट ट्रेड मार्क टाकून स्टीलचे बनावट पत्रे विक्री करत असल्या प्रकरणी पेण – अंतोरे रोड वरील वासंती स्टीलचे मालक कपिल जैन यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कपिल जैन हा फरार आहे.

पनवेल व पेण परिसरात सुमार दर्जाच्या स्टील पत्र्यांवर डोलवी येथील प्रसिद्ध असलेल्या जे.एस.डब्ल्यू.कंपनीचे ट्रेडमार्क वापरुन स्टील पत्रे विकत असल्याची खबर कॉपीराईट विभागाला मिळाल्यानंतर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी हंबीरराव साठे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पेण शहरातील अंतोरे रोड वरील वासंती स्टील या दुकानावर बुधवार ( दि.25) सायंकाळी धाड टाकून झडती घेतली असता जेएसडब्लू कंपनीचे खोटे शिक्के मारलेले 61 हजार 230 रुपये किंमतीचे 53 बनावट पत्रे आढळून आले.

बनावट शिक्के मारून पत्रे विक्री करत असल्या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी हंबीरराव साठे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पेण पोलिसांनी वासंती स्टीलचे मालक कपिल जैन यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नं.0011/ 2021 प्रकाशन हक्क (कॉपीराईट)अधिनियम 1957,प्रकाशन हक्क (कॉपीराईट) अधिनियम1957
( कलम 51,63) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासंती स्टीलचे कपिल जैन फरार असून या प्रकरणी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे अधिक तपास करीत आहेत.

पेण परिसरात मागील काही वर्षांपासून असे अनेक ठिकाणी स्टीलचे काळे धंदे सुरु असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे. सर्व सामान्य नागरिकांची अशी फसवणूक करणाऱ्या दुकानदारा विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *