पेणमध्ये कंपाउंडर झाला डॉक्टर , मागील बारा वर्षांपासून करतोय रुग्णांची फसवणूक, पेण वाशी येथील बोगस डॉक्टर जयेश म्हात्रे वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Share Now

117 Views

पेण (देवा पेरवी) पेण तालुक्यातील वाशी गावात मागील अनेक वर्षांपासून श्री गजानन डेंटल क्लिनिक या दवाखान्यात बोगस दंत चिकित्सक म्हणून कार्यरत असलेल्या जयेश म्हात्रे याचे कडे दंत चिकित्सक म्हणून कोणतीही पदवी अथवा कायद्देशीर परवाना नसल्याचे उघड झाल्याने त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी पेण डेंटल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र या बाबत वडखळ पोलिसांकडे 18 फेब्रुवारी 2021 ला तक्रार करून देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याने वडखळ पोलिसांच्या या “अर्थ” पूर्ण भूमिकेबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.

स्वतःला डॉक्टर म्हणून मिरवणारा जयेश म्हात्रे हा मागील दहा ते बारा वर्षांपासून पेण तालुक्यातील वाशी गावात श्री गजानन डेंटल क्लिनिक या दवाखान्यात दंत चिकित्सक ( डेंटिस्ट) म्हणून क्लिनिक चालवत आहे. विशेष म्हणजे त्याच्या कडे दंत चिकित्सक म्हणून कोणतीही पदवी त्याने संपादीत केलेली नाही व त्याला कोणतीही अधिकृत मान्यता नसताना देखील दातांच्या विकारावर सर्जरी सारखे उपाय देखील बिनदिक्कत पणे करून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम करत आहे. या बाबत संशय आल्याने पेण डेंटल असोसिएशनने या बाबत माहिती घेतली असता जयेश याचा चुलत भाऊ डॉ.रुपेश म्हात्रे हा पनवेल येथे वैद्यकीय व्यवसाय करत असून त्याच्या नावाखाली जयेश हा वाशी येथे बेकायदेशीर पणे व्यवसाय चालवीत असल्याचे निदर्शनास आले. या बाबत मागील फेब्रुवारी महिन्यात या बाबत पेण डेंटल असोसिएशनने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र आज महिना होत आला तरी जयेश याच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आली नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी डेंटल असोसिएशनने पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा म्हात्रे यांच्या कडे देखील तक्रार केली असता डॉ.मनीषा म्हात्रे यांनी केलेल्या चौकशीत देखील जयेश हा डॉक्टर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टर नसताना देखील मागील अनेक वर्षांपासून रुग्णांना फसवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या जयेश म्हात्रे या भामट्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

वाशी,ता.पेण येथील जयेश म्हात्रे या व्यक्तीकडे दंत चिकित्सा ( डेंटिस्ट ) कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही तसेच आमच्याकडे कोणतेही रजिस्ट्रेशन नंबर नाही. त्यामुळे पेणमधील व इतर नागरिकांनी या व्यक्ती कडे कोणतेही उपचार करू नयेत असे आवाहन केले. या बोगस डॉक्टरकडे उपचार घेतलेल्या पीडित व्यक्तींनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पुढे यावे असे
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा म्हात्रे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *