अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्येवर पुर्णतः नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी व नागरिकांमध्ये मास्क, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर राखणे या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्रिसूत्रीचा पुन्हा एकदा प्रसार व प्रचार करण्यासाठी रोहा बाजारपेठेत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
रोहा अष्टमी नगरपरिषद व रोहा पोलीस यांच्या विद्यमाने बाजारपेठेत प्रचारफेरी काढत ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, पोलीस निरिक्षक नामदेव बंडगर, आरोग्य सभापती महेंद्र दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर,नगरसेवक अहमद दर्जी, चंद्रकांत पार्टे, डॉ. फरीद चिमावकर, रियाज शेट्ये,अलीम मुमेरे, आदिंसह पोलीस व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी सामील झाले होते.
गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर सायंकाळी घंटा व थाळी नाद करावयाचे असेही त्यांनी सांगितल्या प्रमाणे जनतेने केले.त्यानंतर २४ मार्च रोजी संपूर्ण लॉकडाउन पुकारण्यात आला.मात्र त्यानंतरही कोरोना नियंत्रणात न येता तो दिवसेंदिवस वाढतच राहिला.यादरम्यान रोहा शहर व परिसरात कोरोनाचा संक्रमण होवू नये यासाठी रोहा अष्टमी नगरपरिषद, रोहा पोलीस यांचेसह सर्वच प्रशासन आजही निरंतर आपले कर्तव्य बजावत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासुन पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरु केल आहे. नागरीकांना मास्क न घालणे व अन्य सुरक्षा नियमांचा विसर पडला होता. त्यांच्या मध्ये पुन्हा जनजागृती करण्यासाठी या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आला होते. पोलीस चौकी, बाजारपेठ, विर सावरकर रोड , नगरपरिषद कार्यालय, बसस्थानक अश्या मार्गावर ही रॅली काढण्यात आली.
यावेळी विना मास्क असणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क देण्यात आले. यासोबतच पुन्हा जर विना मास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल अश्या सुचना देण्यात आल्या. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा टाळा, सामाजिक अंतर कायम ठेवत स्वच्छता बाळगत कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.