बिरवाडी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली, वीज वितरण कंपनीची 22 हजार केव्ही व्होल्टची विद्युत वाहिनी धोकादायक स्थितीत, तात्काळ दुरुस्ती न केल्यास महावितरण विरोधात आंदोलन करू : जयेश पार्टे

Share Now

1,479 Views

महाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसी रस्त्यालगत डोंगरा नजिक 22 हजार केव्ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी भूमिगत टाकण्यात आली आहे. मात्र या केबलचे प्लास्टिक आवरण निघून सदरची विद्युत वाहिनी धोकादायक स्थितीत असल्याची बाब बिरवाडी ग्रामपंचायतीचे वॉर्ड क्रमांक तीनमधील ग्रामपंचायत सदस्य जयेश पार्टे, संकेश कदम, मंगेश खामकर, तजमूल माटवणकर, सुमीत घाग, ग्रामपंचायत सदस्य सचिन बागडे,डी.के ग्रुप मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक स्वाई यांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय पोळ यांच्या निदर्शनास आणून दिली.

या ठिकाणावरून बिरवाडीमधील दुधाने आवाड, टाकी कोंड, मधले आवाड, वेरखोले, या गावातील शेतकरी ये जा करतात त्याप्रमाणे जनावरांची देखील याच ठिकाणावरून होत असते. त्यामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी तात्काळ दुरुस्ती न केल्यास वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरवाडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य जयेश पार्टे यांनी दिला असून यापूर्वी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका बसून वेरखोले येथील दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेची आठवण देखील बिरवाडी ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाला करून दिली.

याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता गोरेगाव विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता नागरिकांनी सतर्क राहून सदरची बाब महावितरणच्या लक्षात आणून दिल्याने त्याठिकाणी तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महाड एमआयडीसी मधील साहाय्यक अभियंता संजय पोळ यांना दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वरिष्ठ अधिकार् यांच्या सूचनेनंतर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी धोकादायक स्थितीत असलेल्या उच्चदाबाच्या भूमिगत विद्युत वाहिनीच्या केबल जवळ पोहचले व त्यांनी तात्पुरता त्याठिकाणी सिमेंटचे पाइप वरती ठेवून तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *