पोस्को प्रकरणातील आरोपीचे पोलीस कोठडीतून पलायन, महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यातील घटना

Share Now

1,751 Views

महाड (दीपक साळुंखे) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने महाड एमआयडीसी पोलिसांच्या कोठडीतून पलायन केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (३० मार्च ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर महाड उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश तांबे पोलिस निरीक्षक शैलेश सणस नीलेश गवारे हे महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले होते मात्र अद्याप आरोपींचा शोध घेण्यात पोलिस यंत्रणेला यश आलेले नाही.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की रज्जाक मौलासा चापरबंद ( वय २३, रा. काळीज ता. महाड, मूळ रा. विजापूर कर्नाटक ) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बाललैगिक अत्याचार प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने १ एप्रिल २०२१ पर्यंत पोलीस कोठडी दिल्याने तो एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत होता. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याला जेवण देण्यात आले. त्यानंतर तो हात धुण्याच्या आणि बाथरुमला जाण्याच्या बहाण्याने तो कोठडीतून बाहेर पडला आणि उपनिरिक्षक पवार आणि गार्ड सावंत यांची नजर चुकवून त्याने पोलीस ठाण्यातून पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश तांबे, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शैलेश सणस तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपीच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात येत असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक सागर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रज्जाक चपरबंद याच्या विरोधात भा.दं.वि.स. कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज गिरी हे करित आहेत. गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलीस कस्टडी मधून पळून जाण्याची ही महाड तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने एकच खळबळ उडाली असून बारा तास उलटून गेल्यानंतर देखील आरोपीला पकडण्यात पोलिस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. या प्रकरणामध्ये रायगडचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *