बिरवाडीमध्ये विद्युत खांब धोकादायक स्थितीत, वीज मीटरचा देखील तुटवडा, नागरिकांची गैरसोय

Share Now

629 Views

महाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणार्या बिरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये विद्युत खांब धोकादायक स्थितीत असून वीज मीटरचा देखील तुटवडा असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बिरवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या दहा हजारापेक्षा जास्त असून बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त विद्युत ग्राहक आहेत. मात्र या परिसरातील धोकादायक स्थितीतील विद्युत खांब नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील बदलले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बिरवाडी कराड आळी येथील नागरिक अनिल नगरकर यांनी आपल्या परिसरातील धोकादायक विद्युत खांब बदलण्याच्या मागणीकरिता अनेकवेळा महावितरण कंपनीकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यांच्या परिसरातील विद्युत खांब अद्याप बदलण्यात आलेले नाहीत. तसेच बिरवाडी मधील वास्तुशिल्प या इमारतीजवळ विद्युत खांब वादळी पावसामुळे एक बाजूला कलंडलेला स्थितीत असल्याने या ठिकाणी अतिवृष्टी व वादळी पावसाच्या काळामध्ये एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच ग्राहकांना वीज मीटरसाठी देखील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. दोन दोन तीन तीन महिने ग्राहकांना पैसे भरून देखील वीज मीटर उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता अण्णासाहेब शिंदे यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता वीज मीटर उपलब्ध नसल्याने नवीन वीज मीटर बसविण्याचे काम ठप्प झाले आहे तर विद्युत खांब बसविणार्या टीममधील अनेक कामगारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धोकादायक विद्युत खांब बदलण्याचे काम करण्यात अनेक अडचणी येत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बिरवाडी परिसरात दिवसेंदिवस नागरी वस्ती वाढत असल्याने विद्युत मीटरची मागणी महावितरण कंपनीकडे घरगुती व व्यावसायिक ग्राहक करीत आहेत.नियमाप्रमाणे वीज मीटर घेण्याकरिता दोन ते पाच हजार रूपयांचीअनामत रक्कम ग्राहकाला भरावी लागते. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च केली तरच नवीन विद्युत मीटर बसविला जात असल्याची चर्चा बिरवाडी परिसरात सुरू असून वीज मीटरचे नेमके गौडबंगाल काय ? असा सवाल उपस्थित केला जात असून कोरोना महामारीमुळे महाड तालुक्यामध्ये आमसभा होत नाही यामुळे शासकीय अधिकारी वर्गाला कोणाची भीती राहिली नसून सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न समस्या प्रलंबितच आहेत. एकूणच महाड तालुक्यातील शासकीय कारभाराचा बोजबारा उडाला असल्याने सामान्य नागरिकांनी कोणाजवळ न्याय मागायचा असा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहे.त्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने अनेक व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.यापूर्वी बिरवाडी मध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने अनेक ग्राहकांची विद्युत उपकरणे निकामी होऊन त्यांनादेखील आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या नागरिकांचा आवाज गुन्हे दाखल करून दाबला जात आहे. एखाद्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उठविला तर त्या नागरिकांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा, नियमांचा भंग केला म्हणून गुन्हे दाखल करून बंद केला जातो. हे पोलिसी कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *