मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात चाळण, दुचाकीस्वारांसाठी प्रवास झाला जीवघेणा, दरड कोसळण्याची भीती कायम

Share Now

198 Views

महाड (दीपक साळुंखे) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा 66 च्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना आंबेत फाटा ते नांगलवाडी फाटा या पंचवीस किलोमीटरच्या रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली असून पहिल्याच पावसामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे काम एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आले असून हा महामार्ग 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र या रस्त्याचे रोज डायव्हर्शन होत असल्याने तसेच अपेक्षित सूचना फलक यांची कमतरता राष्ट्रीय महामार्गावर असल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत आहे त्यातच पहिल्या पावसातच राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने दुचाकीने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग व एमआयडीसी याना जोडणार्या नागलवाडी येथील रस्त्याचा काही भाग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

या सर्व गोष्टींमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना अपघात व मृत्यूचे भय वाहनचालक व प्रवाशांच्या मनात कायम असून राष्ट्रीय महामार्गावरील नडगांव गांवच्या हद्दीमध्ये दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये सावित्री नदी पात्रालगत केलेला रस्ता ऐन पावसाळ्यात वाहून गेल्यानंतर तातडीने या ठिकाणी पर्यायी रस्त्यांवर ब्रिज कार्यरत करून वाहतूक सुरू ठेवावी लागली होती. मात्र आता या ठिकाणी डोंगर फोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी देखील या ठिकाणी पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभाग आपत्ती निवारण विभाग यांनी संयुक्तिक पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील बहुतांशी कारखान्यातील कामगार हे स्वत च्या दुचाकीने महाड शहर व परिसरातून कारखान्यांमध्ये कामाला ये जा करीत असतात राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांतून मार्ग काढताना अनेक वेळा अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गणेश उत्सवापूर्वी नेहमीप्रमाणे शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सूचना देत पाहणी दौरा करून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तात्पुरता स्वरुपातील उपाययोजना करण्यावर भर देतात ही परिस्थिती बदलण्याकरिता महामार्गावरील धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.