महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी जागा देण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभाग सकारात्मक

Share Now

163 Views

महाड (वार्ताहर) रायगड जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण पाहता महाड येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरुपी असावे अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी आवश्यक सुमारे ५ एकर दुग्धव्यवसाय विभागाची जमीन उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती केली होती. त्याअनुषंगाने आज मंत्रालयात माननीय दुग्धव्यवसाय विकास मंत्री ना. सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याबैठकीत कोकण विभागामध्ये विशेषत: रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथे उद्भवणाऱ्या आपतकालीन परिस्थितीमुळे राज्य शासनाने महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्प कायमस्वरुपी स्थापित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनास सादर केला आहे. या लोकोपयोगी व अत्यावश्यक कार्यासाठी दुग्धव्यवसाय विभागाची जागा देण्याबाबत तत्वत: मान्यता देण्यात येणार असल्याचे माननीय दुग्धविकास मंत्री महोदयांनी सहमती दर्शवली आहे.

जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे अतिवृष्टी होणे, दरड कोसळणे, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीप्रवणता मोठ्याप्रमाणात होत असतात. जिल्ह्यातील औद्योगिक विकास, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, जलमार्ग, रेल्वे मार्गाचे जाळेही मोठ्या प्रमाणात आहे परिणामी अपघात व आपत्तीजन्य प्रसंगांना येथे तोंड द्यावे लागते. महाड या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेत कायमस्वरुपी एनडीआरएफ टीम तैनात असल्यास बचावकार्यास वेग मिळून जिवितहानी टाळता येऊ शकेल.महाड येथे स्थापन्यात येणाऱ्या एनडीआरएफ पथकामुळे रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपतकालीन घटनास्थळी बचावकार्य जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.