बालकामगार विरोधी दिवसानिमित्त सुदर्शन’मध्ये जागृतीपर कार्यक्रम

Share Now

466 Views

रोहा (प्रतिनिधी) उद्योगासह सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजमध्ये बालकामगार विरोधी दिवसानिमित्त जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व कंत्राटदार व कंपनीतील अधिकाऱ्यांना बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत शपथही देण्यात आली. ‘सुदर्शन’चे उपाध्यक्ष (अभियांत्रिकी) विवेक गर्ग, ‘सीएसआर’ विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक माधुरी सणस, मनुष्यबळ विभागाचे हेमंत तेजे, ‘सीएसआर’चे रुपेश मारबते, आयआर विभागाचे उपव्यवस्थापक केतन पाटील यांच्यासह कामगार संघटनेचे सदस्य, कंत्राटदार आणि कंपनीतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विवेक गर्ग म्हणाले, “सुदर्शन केमिकल्सने कायम बालकामगार ठेवण्याविरोधी धोरण राबवले आहे. त्यांना कामावर ठेवण्यापेक्षा शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. कंपनीशी संबंधित सर्वच कंत्राटदारांनी ही बाब लक्षात घेऊन बालकामगार कामावर ठेवू नयेत. औद्योगिक वसाहतीत कुठेही बालकामगार आढळले, तर आपण त्वरित त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. बालकामगार ठेवणार नाही आणि कोणाला ठेवू देणार नाही, असा निश्चय आपण सर्वानी केला पाहिजे. बाल मजुरीसारख्या अनिष्ट प्रथेमुळे बालकांचे शारीरिक व मानसिक शोषण होत आहे, त्यासाठी बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुदर्शन कायमच कटीबद्ध राहील.”

“सुदर्शन सीएसआर फौंडेशनमार्फत सामाजिक जाणिवेतून आजवर अनेक मुलींना दत्तक घेत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. परिस्थितीमुळे बालकांना कामावर जाऊ लागू नये आणि त्यांना शिक्षणाचा अधिकारी मिळावा, या उद्देशाने सुदर्शन केमिकल्स नेहमीच काम करते. बालकामगार ठेवण्याविरोधात तसेच बालकांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी सुदर्शन केमिकल्स यापुढेही प्रयत्नशील राहील,” असे मत विवेक गर्ग यांनी व्यक्त केले. आयआर विभागाचे अभिषेक लाहुडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विशाल घोरपडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.या कार्यक्रमावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.