माथेरान चे निसर्ग वैभव कायम टिकविण्यासाठी कटिबद्ध ; पालकमंत्री कु. आदिती तटकरे

Share Now

152 Views

अलिबाग (प्रतिनिधी) माथेरान हे निसर्गरम्य ठिकाण केवळ रायगड, महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे वैभव आहे. हे निसर्ग वैभव कायम टिकविण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी कटिबध्द असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने यात नक्की यश मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज माथेरान येथे केले. पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित माथेरान येथील अश्वांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ तसेच माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी त्या माथेरान येथे आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी माथेरानच्या नगराध्यक्षा सौ.प्रेरणा प्रसाद सावंत,उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, बांधकाम सभापती व गटनेते प्रसाद सावंत, सर्व नगरसेवक,अजय सावंत, विलास पाटील, मनोज खेडेकर, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले,उपविभागीय अधिकारी वैशाली ठाकूर -परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, तहसिलदार विक्रम देशमुख, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव, रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक श्री. शिरीष कांबळे व त्यांचे इतर अधिकारी, पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते. सुरुवातीस मौजे दस्तुरी (माथेरान) ता. कर्जत येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण मोहीम व उपचार शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माथेरान या पर्यटनस्थळी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून घोड्यांचा वापर केला जातो. अश्वांचा वाहतुकीसाठी वापर करून येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्ध होतो. या अश्वांच्या आरोग्याची योग्य काळजी राखण्यासाठी त्यांना जंतूनाशक लसीकरण मोहीम व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी येथील घोड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था तसेच ज्याप्रमाणे परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाने अर्थसहाय्य केले आहे त्याचप्रमाणे येथील घोडे व त्यांचे मालक यांच्यासाठी देखील मदत व पुनर्वसन विभागाकडून अर्थसहाय्य देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
यानंतर माथेरान नगरपरिषदेच्या विकासकामांच्या आढावा बैठकीदरम्यान माथेरान नगरपालिकेने पर्यटकांच्या सुविधेसाठी विकसित केलेले “डिजिटल माथेरान” या ॲपचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माथेरानचे ब्रँड अँबेसेडर तसेच सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष श्री.आदेश बांदेकर, मावळचे खासदार श्री.श्रीरंग बारणे,आमदार महेंद्र थोरवे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, हे ॲप पर्यटकांना निश्चितच उपयोगी पडेल. हे ॲप म्हणजे माथेरान नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम आहे.

माथेरान हे जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी जगभरातून पर्यटक भेट देत असतात. मुंबई- पुणे या दोन मोठ्या महानगरांच्या मध्यावर असल्याने तसेच येथील प्रदूषणमुक्त वातावरण, लाल माती, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वेडीवाकडी वळणे घेत आपल्याच ऐटीत शीळ घुमवत निघालेली माथेरानची राणी (मिनी ट्रेन), घोड्यांच्या टापांचा आवाज, ब्रिटिशकाळापासून आपले वैशिष्ट्यपूर्ण असे वेगळे अस्तित्व टिकवून असलेले निसर्गरम्य पॉईंटस् आणि वेगवेगळ्या ऋतूत आपल्या वेगवेगळ्या नयनरम्य छटा दाखविणाऱ्या माथेरानला पर्यटकांची हमखास पसंती असते. या पर्यटकांच्या सोयीसुविधेसाठी ही गिरीस्थान नगरपरिषद वसलेली आहे. पर्यटकांना येथील पॉईंटस् ज्ञात व्हावेत, या पॉईंटस् चे महत्त्व नक्की काय आहे, त्याचा काय इतिहास आहे, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी माथेरान नगरपालिकेने “डिजिटल माथेरान” ॲप तयार केले आहे. तसेच पर्यटकांना इंटरनेटची सुविधा मिळावी यासाठीदेखील दस्तुरी येथे मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा माथेरानला आले. इथला निसर्ग मनाला भुरळ पाडतो. पण जगावर पसरलेला करोनाचा प्रादूर्भाव व त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घोषित केलेला लॉकडाऊन यामुळे येथील वातावरण प्रसन्न वाटत नाही, याचे अतीव दुःख आहे. मात्र माथेरान पर्यटकांनी पुन्हा बहरून यावे, यासाठी आपण सारेच प्रयत्न करतोय. तर जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेले माथेरान हे रायगड जिल्ह्यात असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. पूर्वी येथे पर्यटक आठवडाभर थांबायचे, मात्र आता विकेंड ट्रिपचा पायंडा पडत आहे. तर काही पर्यटक हे वन डे ट्रिप प्लॅन करताना दिसून येतात. पर्यटक इथे थांबले तरच इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल. त्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. या ॲपमुळे पर्यटकांना नक्कीच मदत होईल. तर त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पर्यटकांच्या प्रतिक्रिया नगरपालिकेने घ्याव्यात, ज्यावरून आपल्याला इथले पर्यटन हे अधिक चांगल्या पद्धतीने खुलविता येईल.

राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे, पालकमंत्री म्हणून मी स्वतः असे आम्ही सगळे माथेरानच्या पाठीशी आहोत, येथील पर्यटन निश्चितच अधिक चांगल्या पद्धतीने वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठीच खऱ्या अर्थाने हा दौरा होता,असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सर्वांना आवाहन केले की, करोनाचे संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे सर्वांनीच शासनाने सांगितलेल्या सूचनांचे, नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ॲपच्या उद्घाटनासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले माथेरानचे पर्यटन ब्रँड अँबेसेडर श्री.आदेश बांदेकर म्हणाले की, ॲपचे उद्घाटन हे खूप चांगले झाले आहे. माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेच पण आता माथेरान हे जगात सर्वाधिक सुंदर असे पर्यटनस्थळ होईल, या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. नगराध्यक्ष सौ.प्रेरणा प्रसाद सावंत यांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या माथेरानला आल्यामुळे आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद झाला असून त्यांच्या माध्यमातून माथेरानचा निश्चितच एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून विकास होईल,असा विश्वास आहे, असे सांगून त्यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री कु.तटकरे यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.