सरकार उलथवून टाकण्याची ताकद ओबीसी मध्ये : सुरेश मगर, रोहा तहसील कार्यालयात शांततापूर्ण आंदोलन

Share Now

374 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) महाराष्ट्र बारा बलुतेदार मिळून लोकसंख्येच्या ६० टक्यांपेक्षाही जास्त ओबीसी समाज आहे. आज या सरकारने या समाजाच्या शैक्षणिक, राजकीय, नोकरी या सर्वच आरक्षणाला धक्का लावण्याचे तंत्र अवलंबले आहे. त्याविरुद्ध ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून सर्व समाज एकवटत आपल्या न्यायहक्कासाठी लढा देत आहे.त्याची सुरुवात आज राज्यातील ३५८ तहसील कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चे काढत सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन देत आहे.आगामी काळात राज्यशासनाचे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन राज्यपातळीवरील नेतृत्वाच्या आदेशानुसार अधिक तीव्र करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या भावनांची दखल राज्यशासनाने न घेतल्यास सरकार कोणतेही असो ते उलथवून टाकण्याची ताकद ओबीसी समाजामध्ये आहे असा इशारा रोहा तालुका ओबीसी जनमोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश मगर यांनी दिला आहे.

ओबीसी जनमोर्चाने आज पुकारलेल्या तहसील कार्यालया समोर आंदोलन या अंतर्गत रोहा तहसील कार्यालया समोर आंदोलन करताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा इशारा दिला आहे. गुरुवार २४ जुन रोजी करण्यात आलेल्या या आंदोलन प्रसंगी जेष्ठ समाजनेते मधुकर पाटील, रामचंद्र सकपाळ,ॲड. मनोजकुमार शिंदे, तालुका सचिव महादेव सरसंबे, दत्ताराम झोलगे ,रामचंद्र म्हात्रे,राम कापसे, नंदकुमार म्हात्रे, डॉ.श्याम लोखंडे, अमोल पेणकर, सुहास खरीवले, उत्तम नाईक, नवनीत डोलकर, रामा म्हात्रे, लक्ष्मण मोरे, अमित मोहिते, राजेंद्र पोकळे, गणेश खरीवले, अनंत थिटे, राकेश गुरव, महेश मोहिते, संदेश मोरे आदी ओबीसी समाजबांधवांनी कोरोना नियमांचे पालन करत शांततापूर्ण आंदोलन केले.

ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष मा. आमदार प्रकाश अण्णा शेडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी राजकीय आरक्षण बचाव करण्यासाठी राज्यभर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाने धोक्यात आले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ओबीसीच्या वतीने निदर्शने करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने रोहा तालुक्यातील ओबीसी समाजाने तहसील कार्यालयासमोर तालुका अध्यक्ष सुरेश मगर यांचे नेतृत्वाखाली निदर्शने केली. रोहा नगरपरिषद कार्यालयासमोरील चौकात सर्व ओबीसी बांधव एकत्र येत आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, राजकीय, पदोन्नती आरक्षण मिळालेच पाहिजे असे फलक हाती घेत ओबीसी बांधवांनी घोषणा दिल्या. त्यानंतर रोहा तहसील कार्यालयात जात तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *