सुराज्य व स्पंदन संस्थाच्या प्रयत्नाने अनाथ बालिकेला मिळणार ५ लाख अर्थसहाय्य.

Share Now

124 Views

रोहा (वार्ताहर) कोरोनामुळे सर्व सामान्य जनतेला खुप संकटाचा सामना करावा लागत आहे. यामध्येच अनेक बालकांचे आई वडील कोरोना या रोगाने हिरावून घेतले. या अनाथ बालकांना आश्रय मिळावे तसेच त्यांचे शिक्षण पुर्ण होऊन त्यांना समाजात सक्षम बनविण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान कोविड निधी अंतर्गत व राज्य शासनाने सुद्धा महिला बाल विकास विभाग अंतर्गत नुकतीच नव्या योजनाची घोषणा केली होती.

यामध्ये ० ते १८ वर्षाच्या बालकांचे दोन्ही पालक कोरोनामुळे गमावले असतील त्यांना केंद्र शासनाकडून १० लाख व राज्य शासनाकडून ५ लाखांचे रक्कम ठराविक कालावधीने मिळणार आहेत.
तसेच ज्यांनी फक्त आई किंवा वडील हे गमावले असतील त्यांना सुद्धा विविध लाभ देण्यात येणार आहे.
रोहा शहरातील एक मुलगा व मुलगी यांनी कोरोनामुळे नुकतेच आई वडील गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही बाब स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा तथा रोहा नगरपालिका नगरसेविका सौ.स्नेहा आंबरे यांच्या लक्षात आली असता त्यांनी त्या कुटुंबांचे सांत्वन केले व विविध शासकीय योजना राबविणारी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानला संपर्क करून या घटनेची माहिती दिली.

सुराज्य अध्यक्ष रोशन चाफेकर, हाजी कोठारी यांनी या बालकांची माहिती घेऊन महिला बाल विकास विभागाचे अधिकारींना संपर्क केला. संबंधित अधिकारी श्री.अशोक पाटील(जिल्हा परिविक्षा अधिकारी रायगड ),श्री संदीप गवारे (जिल्हा बाल संरक्षण कक्ष) श्री.कमलेश चांदेकर, (महिला समुपदेशक तथा सुराज्य सदस्य),सुराज्य सदस्य मयूर धनावडे यांनी कुटुंबाची भेट घेत या नवीन योजनेंतर्गत सदर नोंदणी फॉर्म भरून घेतला.

तालुक्यातील पहिली नोंदणी ही झाली असुन असे अनाथ बालक आपल्या भागात आढळल्यास महिला बाल विकास विभागाचे रोहातील कमलेश चांदेकर यांच्या रोहातील पोलीस स्टेशन ऑफिसच्या इथे किंवा सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान संघटनेला संपर्क करण्याचे आवाहन सौ. स्नेहा आंबरे यांनी केले आहे. रोहातील या कुटूंबातील मुलगी १७ वर्षाची असल्यामुळे तीला या योजनेचा लाभ होईल, सदर नोंदणी करून कार्यवाहीसाठी शासनाकडे सुपूर्द केली आहे तसेच अन्य अनाथ बालकांची नोंदणी करून त्यांचा पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया रोशन चाफेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.