उद्योगाबरोबरच कामगारांची भरभराट झाली पाहिजे. ही भारतीय मजदूर संघाची भूमिका ; प्रदेश अध्यक्ष अॅड अनिल ढुमणे

Share Now

155 Views

रोहा (अंजूम शेटे) कामगारांचे प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावण्याचे प्रयत्न भारतीय मजदूर संघ करेल. आम्ही कोणाच्या विरोधात विरोध म्हणून काम करत नाही. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असतो. उद्योग चालला पाहिजे. उद्योग टिकला पाहिजे. उद्योगाबरोबरच कामगारांची भरभराट झाली पाहिजे. ही आपली भूमिका आहे. एकीकडे उद्योगाची भरभराट होते पण कामगारांकडे दुर्लक्ष होत आहे. हे खपवून घेतले जाणार नाही म्हणून कामगारांच्या हितासाठी आवश्यक ते प्रयत्न भारतीय मजदूर संघ करत असते. धाटाव औद्योगिक क्षेत्रात भारतीय मजदूर संघाचे अनेक युनिट स्थापन करण्यात आले आहे.

भारतीय मजदूर संघ कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधलेला नाही.बिगर राजकीय कामगार संघटना आहे.परंतु जे जे कामगारांना सहाय्य करतील त्यांचे सहाय्य घेणे व आपल्या कामगारांचे प्रश्न सोडविणे ही आपली भूमिका आहे असे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड अनिल ढुमणे यांनी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील मझदा कलर्स लिमिटेड या कारखानातील कामगारांनी स्विकारलेल्या भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेच्या नाम फलक अनावरण प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी कंत्राटी कामगार न्याय हक्क समिती अध्यक्ष सुरेश मगर, रायगड जिल्हा इंडस्ट्रियल असोशियन अध्यक्ष संदिप मगर, सरचिटणीस अशोक निकम, भारतीय मजदूर संघ रोहा तालुका अध्यक्ष वैभव घाणेकर, वाशी उपसरपंच अरविंद मगर, भारतीय मजदूर संघ मझदा कलर्स लिमिटेड युनिट अध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव स्वप्निल कांबळे, उपाध्यक्ष सचिन खैरे, खजिनदार निखिल म्हसकर, सह सचिव पंकज म्हात्रे आदी उपस्थित होते. मझदा कलर्स लिमिटेड कंपनी समोर अॅड अनिल ढुमणे, सुरेश मगर यांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.