कोरोना प्रतिबंधक दुसऱ्या डोससाठी पुरेसा कालावधी, नागरिकांनी गर्दी करु नये :- वैद्यकीय अधिक्षिका डॉ. अंकिता खैरकर यांचे आवाहन

Share Now

151 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांतर्गत जेष्ठ नागरिक सभागृहात लसीकरण केंद्र आहे. याठिकाणी बुधवार ७ जुलै रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेत ८४ दिवस झालेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.लस साठा उपलब्धते नुसार फक्त १०० जणांचे लसीकरण करण्यात येणार होते. यामुळे अनेकांना परत जावे लागल्यामुळे नागरिकांचे मधून नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र येथील गर्दी ही कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते याची जाणीव करण्यासाठी व त्यावर योग्य त्या उपाययोजना व नियोजन करावे यासाठी रोहा मधील पत्रकारांनी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. अंकिता खैरकर यांची भेट घेतली. लसीकरण केंद्रावर उद्भवत असलेली सर्व परिस्थिती अपंग, जेष्ठ नागरिक, महिला यांना सहन करावा लागणारा मनस्ताप पत्रकारांनी त्यांच्या समोर मांडला त्यावेळी कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड व कोवॅक्सिन या लसिंचा दुसरा डोस घेण्यासाठी लाभार्थ्यांना पुरेसा कालावधी आहे. त्यामुळे आपले ८४ वा २८ दिवस झाल्यानंतर लगेच आपला डोस व्हावा अशी घाई करत कोणीही गर्दी करु नये असे आवाहन त्यांनी सर्व नागरिकांना केले आहे.यासोबतच जेष्ठ नागरिक सभागृह लसीकरण केंद्रात गर्दी होण्याच्या सर्व कारणे जाणून घेत आगामी काळात नागरिकांना सोयीस्कर ठरेल असे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रोहा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांतर्गत असणाऱ्या रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या जेष्ठ नागरिक सभागृह लसीकरण केंद्रावर बुधवार ७ जुलै रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेत ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार होता.उपजिल्हा रुग्णालयाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे १०० व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार होते.मात्र सकाळ पासुन याठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते. यामध्ये ज्यानी रोहा उपजिल्हा रुग्णालयात आपला पहिला डोस घेतला होता त्यांचेसह अनेक कंपन्यांचे कामगार, तालुक्यासह अन्य बाहेर गावांतील लोक हि मोठ्या संख्येने आली होती.८४ दिवसांचा कालावधी पुर्ण झाल्यामुळे प्रत्येकाला वाटत होते की आपले लसीकरण लवकर व्हावे या उद्देशाने ही सर्व गर्दी झाली होती. ही वाढती गर्दी कमी व्हावी व नागरिकांना दुसरा डोस घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी पत्रकारांनी वैद्यकीय अधिक्षिकांची भेट घेतली. यावेळी डॉ. खैरकर यांनी सांगितले की कोव्हिशिल्ड चा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ ते १२० दिवसांचे मध्ये दुसरा डोस नागरिक घेवु शकतात.कोवॅक्सीन चा पहिला डोस घेतल्यानंतर २८ ते ४८ दिवसांचे मध्ये कधीही दुसरा डोस घेवु शकतात. त्यामुळे नागरिकांना दोन्हीही लसींचा दुसरा डोस घेण्यासाठी भरपूर अवधी मिळणार असून कुणीही घाबरून न जाता कमीतकमी गर्दी करत आपले सुरक्षित लसीकरण करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

सुरुवातीच्या काळापेक्षा आता लसींचा पुरवठा हा बहुतांशी सुरळीतपणे होत आहे.यासोबतच ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवतात त्यांनी तातडीने आपली कोरोना तपासणी उपजिल्हा रुग्णालयात येत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.ज्यांना कोरोनाची बाधा झाली असेल त्यांनी ते यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर ९० दिवसांनी प्रतिबंधक लसीकरण करावे असेही आवर्जून आवाहन केले आहे.स्तनदा माताचे लसीकरण सुरु करण्यात आले असून गरोदर महिलांचे लसिकरणाबाबत आवश्यक त्या सर्व गोष्टींची खातरजमा झाल्यानंतर लवकरच ते सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. अंकिता खैरकर या कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या दिवसापासून अहोरात्र रोहेकरांची सेवा करत आहेत.लसिकरणात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या रोहा मधील पत्रकार अमोल पेणकर, सचिन साळुंखे, महेंद्र मोरे, अक्षय जाधव, महेश मोहिते यांनी भेट घेत मांडल्यानंतर याची दखल घेत आगामी काळात अपंग, जेष्ठ नागरिक, महिला यांना सुलभ होईल असे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.