रोहा, वरसेत खड्डेच खड्डे, नागरिक अक्षरशः हैराण, अनेकांना जडल्या व्याधी

Share Now

430 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा, वरसे सीमारेषेवरील शहर, गावाला खड्डे नवे नाहीत. वर्षानुवर्षे खड्यांतून नागरिकांना रहदारी करावी लागते, खड्डे सवयीचे करावे लागले. रोहा शहरात मागील पाच वर्षात फार काही बदल झालेले नाही. रस्ते अधिक खड्ड्यात गेले. दुसरीकडे अंतिम टप्प्यात बाद होत आलेल्या करोडो रुपये खर्चिक भुयारी ड्रेनेज गटाराने खड्ड्याना अधिक उभारी दिली. भुयारी गटारसाठी रस्ते फोडले, गटाराच्या लाईनचे चेंबर वरती आले. अनेक ठिकाणचे चेंबर अक्षरशः धोकादायक झालेत. दमखाडी ते रायकर पार्क प्रवेशद्वारापर्यंत मोठं मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जिकरीने प्रवास करण्याच्या बाका प्रसंग नगरपालिकेने आणले आहे. याउलट वरसे ग्रामपंचायत हद्दीत जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. भुवनेश्वर ते रोहा शहरात येताना रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे प्रचंड यातना देतात. वरसे ग्रामपंचायत आणि खड्डे यांचे नाते जुनेच आहे. वरसे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांना कधी सुगीचे दिवस येतील ? याची प्रतिक्षा कायम आहे.

रोहा वरसेत जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत रस्त्यांची अवस्था प्रचंड धोकादायक आहे. रायकर पार्कसमोर भलेमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. सध्या पावसाचे पाणी साठल्याने अनेक जण खड्ड्यात धडपडतात तर शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले, मोठे मोठे खड्डे भरण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. खंडेराय मंदिर नेहरूनगर परिसरातील रस्त्यावर असलेले भुयारी गटाराचे चेंबर जीवघेणी ठरत आहे. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने परिसर दुचाकीस्वारांना जीकरीने सामना करावा लागतो आहे. पावसाळ्यापूर्वी काही भागातील रस्ते डांबरीकरण करण्यात आले होते, काही दुरुस्त केले मात्र दमखाडी ते रायकर पार्क पर्यंतचा रस्ता आजही खड्ड्यात गेला नेहरू नगरच्या रस्त्यावर पूर्णतः मलमपट्टी करण्यात न आल्याने नागरिकांसाठी यातना सुरू आहे, याबाबत नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी तातडीने दखल घेत लवकरच पूर्ण मार्ग व अन्य रस्त्यावरील खड्डे भरण्यात येतील असे सांगितले त्यामुळे थोडाफार का होईना नागरिकांना खड्यांतून थोडासा दिलासा मिळणार आहे.

वरसे आणि खड्डे यांचे नाते नवे नाही वरसे ग्रामपंचायत विकासासाठी आतापर्यंत करोडोंचा निधी आला, पण त्यावर त्याचा फार प्रभावी विनियोग झाले नाही, हे कायम अधोरेखित आहे, भुवनेश्वर मुख्य रस्ता यांसह सर्वच वस्तीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. रस्त्यावरून रहदारी करताना नागरिकांची अक्षरशः दमछाक होते. त्यातच भुवनेश्वर झोपडपट्टीतील रस्ता अनेकांनी पाणी पुरवठा लाईनसाठी उखडल्याने अधिकच खड्डे पडले. त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम होणार होते, मात्र पावसाळ्यानंतर होणारे रस्ते दर्जेदार व्हावेत, निकृष्ट ठेकेदाराला रस्त्यांची कामे देऊ नयेत त्याला आमचा विरोध असेल असेही नागरिकांनी सांगितले तर रस्त्यांतील खड्डे तातडीने बुजविले जावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली, रस्त्यांतील खड्डे वरसे ग्रामपंचायत आता इमानीने बुजविते का ? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.