पहूर विभागात मातीचे अवैध उत्खनन, जंगल बोडके, प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, एमआयडीसीच्या जागेत माती उत्खनन केल्याची चर्चा !

Share Now

244 Views

रोहा ( राजेंद्र जाधव ) कोलाड शहर, ग्रामीणात विविध अवैध धंद्यांना पुन्हा नव्याने ऊत आले. दुसरीकडे पहूर विभागात अवैध माती, दगड उत्खनन काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झाले. मुख्यतः दगड उत्खननाने पहूर, जामगाव, भाले परिसराला अक्षरशः विद्रुपपणा आले. अंशतः रॉयल्टी भरून शेकडो ब्रास दगड उत्खनन करण्याचे प्रताप सर्वश्रुत आहे. यात राजकीय ताकद असलेले दगड माफीया नेहमीच वरचढ ठरले, त्यांच्या सततच्या हस्तक्षेपाने स्थानिक महसूल प्रशासन अधिकारी कायम ढिम्म राहिले, अशात मागील वर्षी अवैध दगड उत्खनन प्रकरण गाजले असतानाच आता पहूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत मातीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात केले असल्याचे समोर आले. माती उत्खनन शासकीय एमआयडीसीच्या जागेत केले असल्याचीही चर्चा आहे, याकडे प्रशासन अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करीत आले. त्यातून जंगल बोडके करण्याचे प्रताप काहींनी सुरू केले. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रार केल्या, पण दगड माती माफियांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याचे धाडस महसूल विभागाने कधीच दाखवले नाही. त्यामुळे दगड मातीच्या अवैध उत्खननाकडे कायम जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे महसूल सर्कल, तलाठी प्रशासन आतातरी ठोस कारवाई करतो का ? याकडे कोलाड विभागाचे लक्ष लागले आहे.

कोलाड विभागात गावठी हातभट्टी, अवैध भंगार यांच्यासह लॉजिंगमध्ये चंगळ प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. याकडे सबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असतानाच बहुचर्चित पहूर, भाले, जामगाव विभागात मोठ्या प्रमाणात अवैध दगड, माती, उत्खनन राजरोस चालू आहे. शासनाचे खनिकर्म महसूल बुडवून अतिरिक्त दगड उत्खनन केले जात असल्याचे प्रकार अनेकदा उघड झाले तर काही दगड माफियांनी डोंगर पोखरले, हे सुद्धा कमी पडल्याने रहदारी रस्त्याच्या कडेलाही दगड उत्खनन केल्याचे धक्कादायक प्रकार सलाम रायगड़ने समोर आणले होते, त्या दगड माफियांविरोधात ग्रामस्थांनी वारंवार लेखी तक्रारी दिल्या, त्याकडे महसूल विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असतानाच पहूर ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर पोखरुन ठिकठिकाणी शेकडो ब्रास मातीचे अवैध उत्खनन केल्याची तक्रार समोर आली. याबाबत स्थानिक सजाचे तलाठी मनोरे यांना विचारणा केली असता नेमके कोठे माती उत्खनन केले, रितसर रॉयल्टी भरण्यात आली का ? याची तातडीने माहिती देतो असे सांगितले. त्यामुळे नेमका प्रकार काय ? हे समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहूर ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळ भागात मातीचे उत्खनन एका श्रीमंत व्यक्तीच्या फार्म हाऊससाठी करण्यात आल्याचे समजते. माती उत्खनन शासकीय एमआयडीसीच्या जागेत झाल्याचे बोलले जाते, त्यात कितपत तथ्य आहे, हे समोर येण्याची मागाणी ग्रामस्थांनी केली आहे. शेकडो ब्रास माती उत्खनन केल्याने त्याची रितसर किती रॉयल्टी शासनाला भरण्यात आली का, याची माहिती अद्याप समोर आली नाही. याउलट स्थानिक तलाठी प्रशासनाला याची माहिती नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त झाले. सजाचे तलाठी मनोरे माती उत्खनन व रॉयल्टी संबंधी नेमकी काय माहिती देतात, प्रकरण नेमके काय आहे , याचीच चर्चा सध्या पहुर विभागात सुरू आहे. कोलाड विभागातील गावठी हातभट्टी व अन्य अवैध धंदे यांसह बहुचर्चित पहूर, जामगाव ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दगड, माती उत्खननाला आतातरी महसूल प्रशासन निर्बंध घालतो का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अवैध माती उत्खनन प्रकरणी स्थानिक महसूल विभाग नेहमी काय भूमिका घेतो ? हे पहावे लागेल तर कोलाड विभागचे सामाजिक स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या अवैध धंद्याबाबत पोलीस प्रशासनही काय पाऊले उचलतो ? हेही अधोरेखित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *