रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित, शिक्षक खावटी वाटप कामात व्यस्त, अँड्रॉइड फोन नसल्याने विद्यार्थ्यांची निराशा, वाडीवस्तीवर नेटवर्कही नाही

Share Now

323 Views

रायगड (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय 14 व अनुदानित 10 आश्रम शाळा आहेत. किरोनाचा प्रादुर्भाव हा जरी रायगड जिल्ह्यात असला तरी आदिवासी पाडयावरील एकही विद्यार्थी किंवा त्यांचे पालक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले नाही. याशिवाय महत्वाचे म्हणजे शासनाने ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अश्या भागात शाळा सुरु करा असे म्हटले असले तरी आदिवासी विकास विभागातील एकही शाळा अद्याप सुरु करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड फोन नसल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. याशिवाय वाडीवस्तीवर नेटवर्कही उपलब्ध नसल्याने गेल्यावर्षीही आदिवासी विकास विभागातील बहुतांशी शाळांमधील शिक्षकांनी शिकवलेच नसल्याचे मत विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केले. महत्वाचे म्हणजे शिक्षकांना शासनाने शिक्षकांना खावटी वाटप काम पुर्ण करा असे आदेश दिले असल्याने आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे इतर शाळांप्रमाणे आदिवासी भागातील आश्रम शाळाही सुरू करुन विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे असे सर्वत्र बोलले जात आहे.

रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा आहेत, शासकीय आश्रम शाळा, सावरसई , वरसई , वरवने, साई, सानेगाव, कोळघर, चाफेवाडी, डोलवली, भालिवडी, पिंगळस, पाथरज, नांदवी, कादवन, वेरळ अश्या शासकीय चौदा आश्रम शाळा आहेत तर अनुदानित शाळांपैकी रानपाखर, वावलोळी, चिवे, पडसरे, चिखले, वाकडी, माणगाववाडी, तळोशी, उत्तेखोल व चिरनेर अश्या ठिकाणी दहा आश्रम शाळा आहेत. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशाची पुढची पिढी घडविणारे विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित झाले आहेत. अश्या विद्यार्थ्यांना नेमके काय चालले आहे हेही कळत नाही. आदिवासी विभागाच्या अकार्यक्षमतेवर हे विद्यार्थी निराश आहेत.

वाडीवस्तीवर लाईट नसल्याने गेल्यावर्षीही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. याशिवाय रस्ते सुस्थितीत नसल्याने शिक्षक पावसाळ्यात वाडीवस्तीवर पोहचत नाहीत. महत्वाचे म्हणजे आश्रम शाळेतील परमनंट शिक्षकांना खावटी वाटप काम असल्याने आता या विद्यार्थ्यांची शिक्षणापासून फरपड सुरु आहे. या विद्यार्थ्यांबरोबर आदिवासी विकास विभागाने कंत्राटी व रोजंदारीवर काम करणा-या शिक्षकांनाही वेठीस धरले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता शाळा सुरु झाल्या आहेत तर आदिवासी आश्रम शाळांतही गर्दी होऊ नये म्हणून दहावी व बारावीचे वर्ग सुरु करायला काय हरकत आहे असे शिक्षकांकडूनही बोलले जात आहे.

● शाळा सुरु नसल्याने कंत्राटी क्रीडा, कला आणी संगणक शिक्षकांपैकी 42 शिक्षक गेल्यावर्षी 7 महिने तर आता दोन महिन्यापासून नियुक्ती आदेशापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

● शाळा सुरु नसल्याने तासिका तत्वावर काम करणारे तब्बल 40 शिक्षकांवर नियुक्ती आदेश नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

● 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार

1 ऑगस्ट पर्यंत क्रीडा व कला, संगणक शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत तर 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी प्रकल्प कार्यालय पेण येथे उपोषणाला बसण्याचा इशारा उपासमारिने व्याकुळ शिक्षकांनी दिला आहे.

पेण आदिवासी विकास विभागाअंतर्गत असणा-या शासकीय आश्रम शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रिक्त पदावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रोजंदारी शिक्षक अहोरात्र मेहनत घेऊन ज्ञानदानाचे महत्वाचे कार्य करत आहेत. परंतू कोरोना महमारी काळात आम्हाला नियुक्ती आदेश नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. एका बाजूने मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विभागांना आदेश दिले आहे कि, कोणत्याही रोजंदारी कंत्राटी शिक्षकांना कामवरुन कमी करु नये तर दुसरीकडे आदिवासी विकास विभागाने सर्व रोजंदारी व कंत्राटी कर्मचा-यांना बेरोजगार केले आहे. तरी आम्हा शिक्षकांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश मिळावेत.

ओंकार आनंद सुतार, रोजंदारी शिक्षक, शासकीय आश्रम शाळा वेरळ, मंडणगड, रत्नागिरी

कोरोना महमारीच्या काळात क्रीडा शिक्षकांची भूमिका खुप महत्वाची आहे. विद्यार्थ्यांना योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम शिकवून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ होण्यात क्रीडा शिक्षक महत्वाची भूमिका बाजवतो. त्यामुळे क्रीडा शिक्षकांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश देऊन त्यांचे प्रलंबित वेतन अदा करावे

सुरेश आघाव, क्रीडा शिक्षक सावरसई, पेण- रायगड

Leave a Reply

Your email address will not be published.