अखेर खड्ड्याने घेतला जीव, अपघातात संदीप जंगम यांचा मृत्यू , रोहा नगरपरिषदेच्या कारभाराची ‘ चिरफाड’ सोशल मिडीयावर नागरीकांचा संताप

Share Now

1,114 Views

रोहा (राजेंद्र जाधव) वरसे, मुख्यतः रोहा शहरातील खड्डे अत्यंत धोकादायक झालेत. नागरिक जीव मुठीत घेऊन रहदारी करीत आहेत. त्यातच भुयारी गटार वाहिनी, भुयारी वीज वाहिनीसाठी सातत्याने खोदलेले खड्डे, भुयारी गटाराचे चेंबर जीवघेणे झालेत, याकडे वेळीच लक्ष द्या, खड्डे सामान्यांच्या जीवावर बेतेल, असे सांगत टाइम्सने शनिवारी नगरपरीषदेच्या कारभाराची पोलखोल केली होती, त्यावर नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी खड्डे भरण्याचे आश्वासीत केले होते. त्या टाइम्सच्या वृत्ताला दोन दिवस न होताच त्याच खड्ड्याने भुवनेश्वर येथील नागरीक संदीप जंगम यांचा सोमवारी सकाळी अक्षरश: बळी घेतला. खड्ड्यात तोल जाता जाता मागावून येणा-या पीकअपने संदीप जंगम यांना जोरात धडक देत मागील चाकाखाली चिरडले. त्यात जंगम यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रस्त्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. याच झटापटीत हा भीषण अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी समोर आले. संदीप जंगम यांचा खड्ड्यानेच जीव घेतला, या अपघाताला नगरपरीषद प्रशासन कारणीभूत आहे. संबंधितांवर जंगम यांच्या मृत्यूला जबाबदार धरत गुन्हे दाखल करावे, असा संताप नागरीक मुख्यतः तरुणांनी सोशल मिडीयावर व्यक्त करीत नगरपरिषदेच्या कारभाराची चिरफाड केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भुवनेश्वर गावातील होतकरु ग्रामस्थ संदीप जंगम यांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली, त्यांच्या मृत्यूला खराब रस्ताच कारणीभूत आहे, असा आरोप नातलग यांनी केले, त्या आरोपाची दखल नगरपरिषद प्रशासन कितपत घेतो ? असा सवाल यातून उपस्थित झाले आहे.

रोहा शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. दमखाडी ते नगरपरीषद कार्यालय, नेहरुनगर, सागर डेअरी ते कोर्ट रोड यांसह सर्वच उपरस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेत. रायकर पार्कसमोरील रस्त्यांवर तुंबणा-या पाण्याला मार्ग नसल्याने खड्डे पाण्याने भरतात. तेच खड्डे सामान्यांच्या जीवावर उठलेत, त्यातील रायकर पार्कसमोरील खड्ड्याने सोमवारी सकाळी संदीप जंगम वय 52 यांचा बळी घेतला. दमखाडीकडून संदीप जंगम आपली दुचाकी एमएच 06 बीआर 4883 घेऊन बाजारात जात असताना विटांनी भरलेल्या एमएच 04 डीएस 8012 या क्रमांकाच्या पीकअपने मागून जोरदार धडक दिली. त्यातील धडकेत जंगम खाली पडल्याने पीकअपच्या मागील चाक अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्ता खराब, त्यातही खड्ड्यात पाणी साचल्याने धडपडीत हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. खड्डे भरले असते, पाण्याचा निचरा झाला असता तर अपघातात सामान्य व्याक्तिला जीव गमवावे लागले नसते, असा संताप चोहोबाजूने व्यक्त झाला. अनेकजण खड्यांत धडपडत असल्याने रोज जखमी होतात. अनेकांना शारिरीक व्याधी जडल्या हे असतानाच यात खराब रस्ते, खड्ड्याने संदीप जंगम यांचा अप्रत्यक्ष बळी घेतल्याने नागरिकांच्या संतापात अधिक भर पडली. आतातरी नगरपरिषद प्रशासन भानावर येते का ? हे पहावे लागणार आहे. दरम्यान हमरस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. करोडो रुपये खर्चिक इतिहास जमा झालेल्या भुयारी गटार, वीज वाहिनीसाठी खोदलले रस्ते, त्यातून पडलेले खड्डे, वर आलेले चेंबर अपघाताला निमंत्रण देत आहेत. अशात जंगम यांचा खड्डयाने घेतलेला बळी दुर्घटनेतून नगरपरीषदेने तातडीने रस्ते दूरस्त करेल का ? असा सवाल उपस्थीत झाला तर रस्त्यावर संदीप जंगम यांचा अपघातात मृत्यू झाल्याने नगरपरिषदवर चोहोबाजूने टीकेची झोड उठल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *