अष्टमी नाक्यावर रस्त्यावर पाणी, कुंदलिका नदी दुथडी भरुन वाहू लागली, धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पुराचा धोका

Share Now

296 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा तालुक्यात 202 मिमी पावसाची नोंद झाली असून कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून 23.30 इतकी आहे. रोहा तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाड्यात पावसाचे पाणी घुसले. पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले.

रात्रभर धनगरवाड्यातील लोक भितीने जागेच राहिले. रोहा रेल्वे स्टेशनपासून एक ते दिड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी धनगरवाडा आहे. अतीपावसात डोंगरावरून तीन ते चार मोठे ओढे पावसाळ्यात वाहतात. रविवारी रात्री अती पावसामुळे ओढ्याद्वारे पावसाचे पाणी गावात घुसले. महत्वाचे म्हणजे या ओढ्याचे पाणी गावसमोरील ज्या मोरीद्वारे नदीला जाऊन मिळते त्या मोरीचे बांधकाम अवैध्य केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदरील मोरी ही प्लान इस्तिमेंटनुसार आर.सी.सी बांधणे आवश्यक होते मात्र इंजीनियरच्या चुकिच्या आराखड्यामुळे व कॉन्ट्रक्टरने चुकिच्या पद्धतीने याच जून महिण्यात घाईने काम करुन नागरीकांची फसवणूक केली आहे. याबाबत आम्ही दावा टाकणार असल्याचे मत माजी सरपंच गंगाराम कोकळे यांनी केले. गेली कित्येक वर्ष आम्ही येथे राहतो मात्र कधीच आमच्या घरात पावसाचे पाणी घुसले नव्हते. आता मात्र आम्ही ग्रामस्थ एकत्र येत संबंधीत कॉन्ट्रक्टरवर गुन्हा दाखल करणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

वरसेत गणेशनगर येथे गेली दहा दिवस सतत पाणीच पाणी झाले असल्याने नागरीकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे कामावर दांड्या होत आहेत. कामावर गेलो तर आपले कुटूंब काय करेल या भितीने गणेशनगर भागातील नागरीक घरीच राहात आहेत. वरसेतील गणेशनगर भागात पाणी तुंबण्याचे महत्वाचे कारण या ग्रामपंचायतीमध्ये अवैध्य बांधकामे कारणीभूत ठरत आहेत.

सतत तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने डोंगर माध्यावर पडणारे पावसाचे पाणी शेवटी नदीला येऊन मिळत असल्याने कुंडलिका नदी दुथडी भरुन वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसाचे थैमान असेच सुरु राहिले तर पुर येऊन जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. रोहा शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. अती पडणा-या पावसामुळे जनजीवन पुर्णता विस्कळीत झाले असल्याचे सर्वत्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.