वरसेमधील सर्वच बांधकामांची चौकशी करा : ना.आदिती तटकरेंचे निर्देश

Share Now

427 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहरालगतच असल्याने दिवसेंदिवस नागरिकीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे वरसे, भुवनेश्वर या भागाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या डोके वर काढते.या भागात छोट्या मोठ्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी झाली आहे. हे होत असताना नगररचना व जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या अटीशर्थी नुसार संबंधित विकासक हा बांधकामे करत नसावेत त्यामुळे या समस्या उद्भवत आहेत. ग्रामपंचायती कडे सर्वत्र लक्ष देत यावर नियंत्रण आणणे शक्य नाही. येथील नागरिकांना यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे मनस्ताप यासह घरात पाणी शिरल्यामुळे नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. आता नव्याने सुरु असलेल्या सर्व बांधकामाच्या परवान्यांची खातरजमा करत जेथे नियमांचे उल्लंघन होत असेल ती बांधकामे त्वरीत थांबवा. यासोबतच वरसे ग्रामपंचायती मधील ही समस्या कायम दुर करण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच गृहनिर्माण बांधकामांची नगररचना विभाग, विकासक, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांची एकत्रितपणे बैठक घेत सर्व बांधकाम परवानग्यांची चौकशी करा व ज्यांनी नियमांचे उल्लंघन करत बांधकामे केली असतील त्यांचेवर सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने कारवाई करा असे निर्देश पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी रोहा तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी वर्गाला दिले. वरसे ग्रामपंचायत हद्दीतील वारंवार पाणी तुंबण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी बुधवार २१ जुलै रोजी पाहणी केल्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले.

यावेळी रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, तहसीलदार कविता जाधव,गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, पंडीत राठोड,रा. कॉ. कार्याध्यक्ष मधुकर पाटील, सरपंच नरेश पाटील,उपसरपंच मनोहर सुर्वे,सदस्य रामा म्हात्रे, अमित मोहिते, रामचंद्र नाक्ती, गणेश शिवलकर, राकेश गुरव, शांतीशिल तांबे आदी उपस्थित होते.

रोहा शहरालग असणाऱ्या वरसे ग्रामपंचायत मधील भुवनेश्वर, वरसे या भागात झपाट्याने गृहनिर्माण प्रकल्प उभे रहात आहेत. यासोबतच अनेक नागरिक आपल्या स्वतंत्र घरांच्या मधून वर्षेनुवर्षे वास्तव्य करून आहेत.अनेक छोटेमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे करताना संबंधित मालक व विकासक यांनी नैसर्गिक नाले यांच्या मार्गात अडथळा निर्माण होईल अशी बांधकामे केली आहेत. यासोबतच नगररचना विभाग व मा. जिल्हाधिकारी यांनी गृहनिर्माण प्रकल्प उभा करता असताना दिलेल्या अटी व शर्थिंची पालन न करता मनमानी पणे बांधकामे केली आहेत. यासोबतच कळसगिरी व लगतच्या डोंगरमाथ्यावर पडणारे पावसाच्या पाण्याचा पाटबंधारे खात्याचा कालवा नादुरुस्त व अतिक्रमीत झाल्याने सर्व पाणी भुवनेश्वर, वरसे या भागातून कुंडलिकेला मिळत आहे.

या मानवी अतिक्रमणामुळे पावसाळ्यात या भागात पाणी तुंबण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. खा.सुनिल तटकरे यांनी मागील वर्षी रोहा कोलाड रस्त्याच्या रूंदीकरण काम होत असताना या भागातील पाण्याचा योग्य निचरा व्हावा यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी मोठ्या मोऱ्यांची उभारणी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार त्यांची उभारणी झाली आहे.असे असतानाही वरसे मधील काही भागात विकासकांनी केलेल्या चुकीच्या बांधकामांचे मुळे अंतर्गत भागात ही समस्या जैसेथेच असल्याचे या पावसाळ्यात समोर आले. स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी जातीने या ठिकाणी भेट देत परिस्थिती संपूर्ण जाणून घेत स्थानिकांच्या बरोबर संवाद साधला. यावेळी ग्रामपंचायतीने आपला अधिकार वापरत चुकीच्या पद्धतीने होणारी बांधकामे तात्काळ बंद करावीत. यासोबतच ज्या विकासकांच्या मुळे ही समस्या निर्माण होत आहे त्यांनी स्थानिकांसह एकत्र येत यावर मार्ग काढावा.आगामी काळात सर्वच बांधकामांच्या परवानग्यांची चौकशी करत जेथे कोठे नियमबाह्य कामे झाली आहेत त्यावर कारवाई करत स्थानिकांना या समस्येतून दिलासा द्यावा अश्या सुचना वजा आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.