म्हसळा (प्रतिनिधी) २० आगस्ट २०१३ ला पहाटे पुण्यात ओंकारेश्वर पुलावर फिरायला गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर अज्ञातांनी पाठीमागून गोळ्या घालून खून केला. या घटनेला आज ८ वर्ष पूर्ण होतात. अद्याप खरे मारेकरी व सूत्रधार पकडण्यात शासकीय तपास यंत्रणांना यश आले नाही. तपासातील या दिरंगाई बद्दल चिड, असली तरी गेल्या ८ वर्षात कार्यकर्त्यांनी हातात साधा दगड सुद्धा न घेता संविधानीक व सनदशीर मार्गाने आपला लढा चालू ठेवला. याचे प्रतिबिंब आज राज्यभर निर्भय वाॅक करताना दिसून आले.
आज महा अंनिस शाखा म्हसळा याचे वतीने जिल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अध्यक्ष नवाज नजीर यांच्या नेतृत्वाखाली पाभरे फाटा ते एस .टी स्टँड अशी निर्भय वाॅक रॅली काढुन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन केले व नंतर म्हसळा पोलिस स्टेशन सहायक पोलिस निरीक्षक यांचे कडे मुख्यमंत्री महोदय यांना पाठवायचे निवेदन दिले. यावेळी म्हसळा शाखा प्रधान सचीव रुपेश गमरे, वै.जाणिवा कार्यवाह प्रमोद भा॑जी, प्रशिक्षण कार्यवाह संभाजी शिंदे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे अश्फाक तडवी, जिल्हा अ.नि.प. कार्यवाह प्रा. संजय बेंद्रे व इतर अनेक कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.
आज जिल्हा रायगड शाखा यांचे वतीने जिल्ह्यातील समविचारी संघटना कार्यकर्ते यांचे सोबत आँनलाईन अभिवादन व निर्धार रॅलीचे आयोजन केले आहे.
यात राष्ट्रसेवा दल, युसुफ मेहेर अली सेंटर, कुष्ठरोग निवारण समाती शातिवन, शेतकरी कामगार पक्ष, सर्वहारा जन आंदोलन, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक समिती, स्त्री मुक्ती संघटना, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय बौद्ध महासंघ, साकव संस्था, भारतीय महिला फेडरेशन, मुलभूत अधिकार संघर्ष समिती, सुरभी स्वयंसेवी संस्था व स्वदेस फाउंडेशन व इतर अनेक समविचारी संघटना व कार्यकर्ते सहभागी होऊन डॉ. दाभोळकर, पानसरे, कलबुरगी, गौरी ल॑केश यांना अभिवादन व विवेकी समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त करणार आहेत अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे यांनी दिली.