रोहा ग्रामीणात ‘हातभट्टी’ पुन्हा जोरात, सामाजिक स्वास्थ धोक्यात पोलीस मुख्यतः उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

Share Now

436 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा ग्रामीणात गावठी हातभट्टीला पुन्हा दमदारपणे जोर आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून हातभट्टी उत्पादन केंद्रावर ठोस कारवाई नाही. त्यामुळे उत्पादीत हातभट्टी रोहा, कोलाड शहर यांसह शहरानजिक अनेक गाव वाडीपाड्यात हातभट्टी वितरीत होत आहे. तालुक्याच्या बहुतेक सर्वच भागात गावठी हातभट्टीची बिनधास्त विक्री होत असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात सामाजिक स्वास्थ अक्षरशः धोक्यात येत असल्याचे दृश्य आहे.अनेक तरुण गावठी हातभट्टीच्या आहारी जात असल्याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. गावठी हातभट्टी पूर्णतः नष्ट करण्यात कधीच पोलीस विशेषतः नामधारी उत्पादन शुल्क विभागाला यश आलेले नाही. याउलट उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टीवरील ठोस कारवाई कधीच दिसलेली नाही, यामागे नेमके गोडबंगाल काय ? याच चर्चेत गावठी हातभट्टीला आता सुगीचे दिवस आले. त्यामुळे आतातरी विषारी गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करण्याची कारवाई रोहा, कोलाड पोलीस प्रशासन करते का ? याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.

गावठी हातभट्टीने तालुक्यात किती हाहा:कार माजविले होते ? याचा विसर सबंधीत प्रशासनाला नेहमीच पडत आहे. गावठी हातभट्टीने दशकांपूर्वी देवकान्हे गावची घडीच विस्कळीत केली. हातभट्टीच्या विषाने अनेकांना प्राण गमवावे लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर सबंधीत प्रशासनाची खडबडून झोप उडाली आणि अशंत: हातभट्टी विक्रीकर धडक कारवाई झाली होती. मात्र काही वर्षापासून पुन्हा नव्याने सबंध तालुक्यात हातभट्टीने अक्षरशः डोके वर काढले. रोहा, कोलाड शहर यांसह आजुबाजूच्या गाववाडीत धाडसाने हातभट्टी विक्री सुरू झाली. केळदवाडी, उसर, कोलाड ग्रामीणात हातभट्टीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले, त्यातील अनेक उत्पादीत हातभट्टया, विक्री केंद्रावर धाडीही टाकण्यात आल्या. पण हातभट्टी पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची कारवाई कायम लुटूपुटूची राहिली. त्यातच उत्पादन शुल्क विभाग हातभट्टीवर समाधानकारक कारवाई कधीच करत नाही. त्यामुळे हातभट्टी विक्रीला अधिक जोश आले, एवढेच काय ? भेसळयुक्त विषारी ताडीमाडी विक्रीकडेही उत्पादन शुल्क विभाग कायम दुर्लक्ष करीत आले. याच विषारी ताडीमाडीने अनेकांचे जीव गेले, तरुण देशोधडीला लागत आहे, हे भयान वास्तव असतानाच ग्रामीणात हातभट्टीला आलेला जोश सामजिक स्वास्थ बिघडवीत आहे.

तालुक्यातील कोलाड ग्रामीण, सांगडे, मेढा, चणेरा, धाटाव, वरसे, उसर, घोसाळे विभागात हातभट्टी विक्रीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. केळदवाडी, उसर, निवी ठाकूरवाडी परिसरातून शहर, ग्रामीणात हातभट्टी विक्रीसाठी येत असल्याची चर्चा आहे. सर्वत्र अगदी सहज हातभट्टी उपलब्ध होत असल्याने वृद्ध मुख्यतः तरुण कमालीचा व्यसनाधीन झाला. आता सणासुदीच्या दिवसात हीच हातभट्टी सामाजिक स्वास्थ धोक्यात आणेल अशी भीती व्यक्त झाली आहे. त्यामुळे हातभट्टी धंद्यावर रोहा पोलीस मुख्यतः उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान रोह्याचे नवे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी गावठी हातभट्टी विरोधात मोहिम उघडावी, सबंधीत विभाग पोलीस अधिकारी हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात कसे कमी पडतात ? याची माहिती घ्यावी अशी सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त झाली, तर धाटाव पोलीस हद्दीत राजरोसपणे हातभट्टीची विक्री होते, त्यावरही धाटाव पोलीस विभाग कारवाई करतो का ? हे समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *