रोहा रेल्वे पोलिसांचे कौतुकास्पद प्रसंगावधान, हरवलेली चिमुकली दोन तासांत कुटुंबियांना स्वाधीन

Share Now

744 Views

रोहा (महेंद्र मोरे) राज्यात मागील पंधरा दिवसांत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. अश्या काळात रोहा रेल्वे पोलीस चौकीचे निरिक्षक आर.व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आपले कर्तव्य पार पाडले. आपली ७ वर्षाची नात घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली असून मी तीचा रेल्वे स्थानक परिसरात शोध घेत असल्याचे रोहा रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांना सांगितले. या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही माहिती निरीक्षक जगताप यांना दिली. त्यानंतर निरीक्षक जगताप यांनी तातडीने सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व स्थानकांवर याबाबत माहिती देत तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर रोहावरुन कल्याण येथे जाणाऱ्या रेल्वे कामगार गाडीमध्ये एक मुलगी आढळून आली. अश्या प्रकारे आजच्या महिला असुरक्षिततेच्या वातावरणात गांभीर्य ओळखून तातडीने दखल घेत घरच्यांच्या पासून ताटातुट झालेल्या चिमुकलीला अवघ्या दोन तासांत सुरक्षितपणे तिच्या कुटुंबियांकडे रोहा रेल्वे पोलिसांनी स्वाधीन करत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.

या घटनेबाबत रोहा रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी रोहा रेल्वे स्थानक परिसरात एक वयोवृद्ध महिला कुणाचा तरी शोध घेत असल्याचे कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्या महिलेकडे चौकशी केली असता तीने तिचे नाव जमुनाबाई नारायण काळे वय ६५ वर्षे असल्याचे सांगितले. ती घोलाई देवी मंदिराच्या बाजूला, खारिगाव, पाखाडी, कळवा, ठाणे येथे राहते असे सांगितले. तिची मुलगी लग्नानंतर अष्टमी येथील कासार आळी येथे रहात असून ती फुलहारे विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. मुलीला भेटण्यासाठी मी रोहा आली असताना आज सकाळी माझी नात पल्लवी दत्तु पवार वय सात वर्षे ही घरातून खेळण्यासाठी बाहेर आली ती अजूनपर्यंत घरीं न पोहोचल्यामुळे मी तीचा शोध घेत असल्याचे तिने रेल्वे पोलीस सुरेंद्र व शिवाजी पाटील यांना सांगितले.

त्यांनी याबाबत तातडीने निरीक्षक आर. व्ही. जगताप यांना माहिती दिली. निरिक्षक जगताप यांनी राज्यातील मागील पंधरा दिवसांतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची पार्श्वभूमी जाणून तातडीने तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम रोहा रेल्वे स्थानक परिसरात कसून तपासणी केली. त्यानंतर निरीक्षक जगताप यांनी वायरलेस मेसेज व सोशल मिडियाच्या माध्यमातून रोहा पुढील सर्व स्थानकांवर यासंबंधी तपास करण्याच्या सुचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या. कासू स्थानकावर तैनात आरपीएफ जवान रुदल प्रसाद यांना रोहावरुन कल्याणला जाणाऱ्या रेल्वे कर्मचारी गाडीत एक अल्पवयीन मुलगी एकटीच प्रवास करताना आढळली. त्यांनी तातडीने त्या मुलीला गाडीतून उतरवून घेत याबाबत निरीक्षक जगताप यांना कळविले. त्यानंतर त्या मुलीचा फोटो रोहामध्ये शोध घेत असलेल्या जमुनाबाई काळे यांना दाखविला. त्यावेळी जमुनाबाई काळे यांनी हिच माझी सकाळपासून घरातून बेपत्ता असलेली नात असल्याचे सांगितले. त्यानंतर रेल्वे पोलीस नागोठणे येथे जात त्या मुलीला रोहामध्ये आणून अवघ्या दोन तासांत तिच्या कुटुंबियांकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले. आजच्या सर्वच वयोगटातील महिलांचे वर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे वेळीच दक्षता घेत रोहा रेल्वे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलिला तिच्या कुटुंबियांकडे सुरक्षितपणे सुपूर्द केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *