फार्म हाऊसवाल्यांचा नदीला ‘विळखा’, अनेक बांधकामे नदीत घुसण्याच्या तयारीत, धक्कादायक दृश्य समोर, सबंधीतांना नोटीस पाठविणार; उभारे

Share Now

351 Views

रोहा (राजेंद्र जाधव) कोलाड, सुतारवाडी, खांब विभागातील मोठमोठ्या धनिकांचे वाढती फार्म हाऊस संस्कृती नैसर्गिक साधन संपत्ती मुख्यतः नदीच्याच जिवावर बेतते की काय ? असेच धक्कादायक दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी पुणे, मुंबई, अन्य शहरांतील श्रीमंतानी मातीमोल किंमतीत विकत घेतल्या, त्यासाठी काही राजकारण्यांनी धनिकांसाठी कायम रेड कार्पेट टाकले. मग काय ? बहुतेक फार्म हाऊसवाल्यांनी अक्षरश: नदीलाच विळखा घातला. अनेक एकरांत पसरलेले फार्महाऊस जादुई दुनियासारखे भासतात. त्यातील अनेक फार्महाऊसमध्ये अनेक कारनामे चालत असल्याचेही अनेकदा उघड झाले. हाणामारी, खुनासारखे प्रकारही घडले. विविध ऍक्टिव्हिटीसाठी काहींना संबंधीत विभागाच्या परवानग्या सुद्धा नाहीत. काहींनी तर विनापरवाना जंगल पोखरून रस्ता केला. त्यासाठी वनविभाग मुख्यत: काळ प्रकल्पाचे काही अधिकारी एकमेकां सहाय्य करू याच ब्रिदवाक्याची जोपासना करतात, अखेर नदीकाठी मातीचे भराव, नंतर बांधकामे नदीत घुसण्याच्या तयारीत असल्याने रिव्हर पॉलिसीलाच धक्का बसत असल्याचेही पुढे आले, अशा गंभीर बाबी असतानाच संभे पाले हद्दीतील काही फार्म हाऊसवाल्यांनी नदीलाच विळखा घालण्याचा प्रताप केला, यावर टाइम्सने वारंवार झोड उठविली. अवैध माती भराव, काठाच्या आत नदी पात्राकडे बांधकाम केल्याचे समोर आणले, मात्र फार्म हाऊसवाल्यांनी सुधारणा केली नाही. याला कोलाड काळ प्रकल्प विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, अशी टीका पुन्हा सुरू झाली. काळ प्रकल्प विभाग कायम झोपेत असल्याने नदीचे नैसर्गिक जगणे धोक्यात आले याकडे आतातरी काळ प्रकल्पाचे नवे मुख्य अभियंता लक्ष घालतील का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

कोलाड काळ प्रकल्प विभागाचा अनागोंद कारभार सर्वश्रुत आहे. पाटबंधारे काळ प्रकल्प विभाग कारभारात पारदर्शकता नाही. अनेक चुकीच्या गोष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात नसल्याचे खुद्द काही प्रामाणिक कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. काळ प्रकल्प विभागाच्या झोपेचा फटका आता नदीच्या पात्रालाही बसत आहे. खांब, पुगाव, सुतारवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात फार्म आहेत. बाहेरील श्रीमंत वर्गाचे फार्म अक्षरशः जादुई दुनिया वाटते. काही फार्ममध्ये प्रसिद्ध राजकीय लोकांचे साटेलोट आहे. काही स्थानिक तरुणांचे मोजके फार्म, रोजंदारी वगळता बाहेरील फार्महाऊस मालकांची अरेरावी अनेकदा चर्चेत आली. विनापरवाना विविध ऍक्टिव्हिटी, नदीच्या पात्राचा अवैधपणे वापर, नदीच्या काठावर सर्रास बांधकामे याकडे वनविभाग, काळ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. काही फार्महाऊसवाले तर अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी बाहेरील धनिकांसमोर पायघडी घालतात आणि स्थानिक फार्मवाल्यांना लाथा घालतात हे पण लपून राहिले नाही, हे सर्वच धक्कादायक असताना संभे पाले हद्दीतील विशेषत: बाहेरील फार्महाऊसवाले अधिकाऱ्यांना हाताशी धरून चक्क नदीलाच विळखा घालत असल्याचे टाइम्सने पुन्हा बुधवारी नव्याने समोर आणले. नदीकाठावर असलेल्या फार्म हाऊसचे भराव प्रकरण गाजले होते. फार्महाऊसचे बांधकामही आता नदीच्या पात्राकडे सरकत आहे. यातील बहुतांश फार्म हाऊसवाल्यांनी नदीला विळखा घातला. संभे, पाले हद्दीतील फार्म हाऊसवाल्यांवर काय कारवाई करणार ? यावर अभियंता आर एस उभारे यांची मुळमुळीत प्रतिक्रिया दिली. फार्महाऊसवाले ऐकत नाहीत, संबंधीत फार्म हाऊसवाल्यांना पुन्हा नोटीस बजावतो असे दूरध्वनीवरून सांगितल्याने नदीला विळखा घालणाऱ्यांवर आतातरी काय कारवाई होते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, बहुतांश फार्म हाऊसवाल्यांना नदीलाच विळखा, बांधकामे नदीत घुसण्याच्या तयारीत, याबाबत सखोल चौकशी करून काळ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता धाकतोडे नेमकी काय भूमिका घेतात, योग्य ती कारवाई करण्याचे धाडस दाखविले जाते का, संभे पालेतील संबंधीत फार्म हाऊसवाल्यांवर नेमकी काय कारवाई होते ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे, तर खांब, सुतारवाडी विभागातील फार्म हाऊसवाल्यांकडे काय परवानग्या आहेत, रिव्हर पॉलिसीचे कितपत निर्बंध पाळले गेले ? याबाबत काळ प्रकल्प पाटबंधारे विभाग योग्य स्पष्टीकरण करतो का ? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *