पेणमध्ये बेकायदेशीर सावकारी व्यवसाय जोरात, डॉ.शेखर धुमाळ यांची दीपक समेळ यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

Share Now

97 Views

पेण (प्रतिनिधी) पेण शहरासह तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाने जोर धरला आहे. सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडता फेडता अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. जोहे येथील डॉ.शेखर धुमाळ यांना देखील या बेकायदेशीर सावकारी व्यवसायाचा फटका बसला असून धुमाळ यांनी याबाबत दीपक समेळ यांच्या विरोधात पेण पोलिसांत तक्रार केली असल्याचे डॉ.शेखर धुमाळ यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बोलताना डॉ.शेखर धुमाळ यांनी सांगितले कि, पेण शहरातील गणपती कारखानदार दीपक समेळ यांच्या कडून सन 2014 मध्ये व्यवसायासाठी तीन लाख रुपये दहा टक्के व्याजदराने घेतले होते. त्यावेळी समेळ यांनी माझ्या कडून बँक ऑफ बडोदाच्या जोहे येथील शाखेचे चेक नं.000020 चेक नं.000021 असे दोन कोरे चेक व 500 रुपयांचा कोरा बॉण्ड पेपर सिक्युरिटी म्हणून घेतले होते. सदरची रक्कम ही सन 2014 सालीच व्याज व मुद्दलासह परत केली असून, यावेळी माझे कोरे चेक व बॉण्ड पेपर हे परत मागितले असता ते फाडून टाकतो म्हणून समेळ यांनी सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांनी ते चेक व बॉण्ड त्यांच्या कडेच ठेऊन दिले असल्याचे डॉ.शेखर धुमाळ यांनी सांगितले.

तरी देखील दीपक समेळ यांनी जास्त पैशांच्या लालसेपोटी माझ्या 2014 साली घेतलेल्या चेक व बाँड पेपरचा गैरवापर करुन एका चेक वर सात लाख रुपये व दुसऱ्या चेक वर आठ लाख रुपये अशी खोटी रक्कम टाकून माझ्या विरोधात पेण न्यायालयात खोटी केस दाखल केली असल्याचे डॉ.शेखर धुमाळ यांनी सांगितले. पेण न्यायालयात दाखल केलेली केस मला 6 ऑक्टोबरला पोलीस हे कोर्टचा समन्स घरी घेऊन आल्यावर नंतर समजले. याबाबत मी माझे मित्र चंद्रकांत पाटील यांचेकडे सांगितला असता त्यांनी दीपक समेळ यांची भेट घेऊन विचारले असता त्यांनी मला साधारणतः तीन लाख रुपये दहा टक्के व्याजाने दिले होते असे सांगितले. त्यांच्या या संभाषणाची व्हिडीओ देखील करण्यात आली असल्याने दिपक समेळ हे सावकारी करण्याचा कोणतेही लायसन्स नसताना बेकायदेशीरपणे सावकारी व्यवसाय करत असल्याचे सिद्ध होत आहे असे डॉ.शेखर धुमाळ यांनी सांगितले.

दीपक समेळ यांनी बाऊन्स केलेले चेक हे फार जुने असून त्या नंतर माझे बँक ऑफ बडोदाच्या जोहे बँकेतील अनेक चेक बुकचा वापर मी माझे व्यवसाय निमित्त केला आहे. समेळ यांनी माझ्या कोऱ्या चेकचा केलेल्या गैर वापराचा पोलिसांनी सखोल तपास करावा व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील पेण पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात केली आहे. बेकायदेशीर सावकार दीपक समेळ यांनी 000020 क्रमांकाच्या 7 लाख रुपयांच्या चेक वर 10 जानेवारी 2021 अशी तारीख टाकली आहे, तर त्या नंतरच्या दुसऱ्या चेक क्रमांक 000021 वर 8 लाख रुपये रक्कम टाकून 25 डिसेंबर 2020 रोजी दिला असल्याचे नमूद केले आहे. जर मी हे चेक भरून दिले असते तर चेक नं 00020 हा अगोदर चा व 000021 हा चेक त्या नंतरचा दिला असता. यावरूनच दीपक समेळ यांचा खोटेपणा उघड होत असल्याचे डॉ.धुमाळ यांनी केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.

सावकारी करणारे दीपक समेळ यांनी समाजात माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावर खोट्या केसेस केल्या असून या बदनामी मुळे मला भविष्यात आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. बेकायदेशीर पणे सावकारी व्यवसाय करुन अनेकांविरोधात खोट्या तक्रारी करणाऱ्या दीपक समेळ याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील डॉ.शेखर धुमाळ यांनी 13 ऑक्टोबर 2021 ला पेण पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दिलेल्या तक्रारी अर्जात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *