रोहा शहरातील प्रसिद्ध स्वीट मार्टकडून निकषांचे बेधडक उल्लंघन ; हम न सुधरेंगे, अन्न व औषध प्रशासनाचे कायम दुर्लक्ष ?

Share Now

923 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहरातील प्रख्यात स्वीट मार्ट दुकानदाराकडून कालबाह्यता पदार्थांची विक्री, त्यातून झालेली विषबाधा घटना, स्वच्छतेचा कायम अभाव हे प्रकरण ताजे असतानाच एसटी स्टँड लगतच्या प्रख्यात स्वीट स्मार्ट दुकानदारही अन्न व औषध प्रशासनच्या निकषांचे बेधडक उल्लंघन करीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दुग्धजन्य पदार्थांवर कालबाह्यता, उत्पादन डेट लावले जात नसल्याचे पाहायला मिळाले. याबाबत स्वीट मार्टच्या मालकाला विचारणा केली असता दिवाळीनंतर डेट टॅग लावले जाईल अशी उडवा उडवीची उत्तरे दिली. यातून स्वीट मार्टच्या मालकांनी हम न सुधरेंगे हेच अरेरावीतून दाखवून दिले. दरम्यान बहुतेक स्वीट मार्टचे मालक हे स्थायिक परप्रांतीय आहेत. इथल्या मातीशी नाळ असताना सामान्यांच्या जीवाशी का खेळतात, त्यांना काहीच कसे वाटत नाही असा संताप व्यक्त होत आहे. तर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांना संपर्क केले असता प्रतिसाद दिले नाही अखेर तहसिलदार कविता जाधव यांनी संबंधित तक्रारीची तातडीने दखल घेऊन माहिती घेतो असे सांगितले. त्यामुळे संबंधीत प्रशासन स्वीट मार्ट विक्रेत्यांना काय धडा शिकवितात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील फळविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांसह स्वीट विक्रेते सामान्यांच्या कायम जीवाशी खेळतात हे नवे नाही. दोनतीन महिन्यापूर्वी एका प्रख्यात स्वीट मार्ट विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. निकृष्ट दर्जाची स्वीट विक्री, अस्वच्छता याबाबतच्या तक्रारींवरुन अन्न व औषध प्रशासनाने सबंधीत दुकानदारावर दुकान बंदीची कठोर कारवाई केली. त्यानंतर विषबाधा प्रकरण घडले, पण त्याची वाच्यता झाली नाही. संबधीत स्वीट मार्ट दुकानदाराच्या कारवाईतून इतर स्वीट मार्ट दुकानदारांनी कसलेच बोध घेतले नाही. याउलट एसटी स्टँड लगतच्या प्रख्यात स्वीट मार्ट दुकानदार कोणालाच जुमानत नसल्याची प्रचिती अनेकांना आली. दूधजन्य पदार्थांवर उत्पादन व एक्सपायरी डेट टॅग दिसत नाही. उत्पादन ठिकाणी अस्वच्छता असल्याचेही दिसून आले. याबाबत विचारणा केली असता राहून गेले, दिवाळीनंतर लावले जाईल असे उत्तर दिले. मूळात अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे खाद्य विक्रेत्यांकडे कायम दुर्लक्ष असते. अधिकारी केवळ पाहुणचारासाठी येतात आणि जातात, हा आरोप नेहमीचा आहे. अधिकारी गंभीर नसतात स्वीट मार्टच्या तक्रारीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी दरडे यांना संपर्क केले असता प्रतिसाद दिले नाही. मात्र तहसिलदार कविता जाधव यांनी तक्रारीनंतर आपण लगेचच माहिती घेतो, नेमका प्रकार काय हे कळवितो हे सांगितल्याने स्वीट मार्टच्या तक्रारींबाबत तहसील प्रशासन त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग नेमकी काय कारवाई करतो ? हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *