रोहा शहरात जुगाराचे नवे पर्व सुरू, जुना खेळाडू पुन्हा सक्रीय ? सर्वत्र एकच चर्चा

Share Now

489 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मटका, जुगार क्लब धंद्याने डोके पुन्हा वर काढल्याचे समोर आले आहे. मुख्यतः माणगाव रोहा तालुक्यात मटका जुगार क्लब जोशात सुरू आहे. रोहा शहरात मागील चारपाच महिन्यांपासून जुगाराच्या अड्डयांचे नवे पर्व सुरू झाले की काय ? अशीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. आम्ही मटका, जुगाराचे कधीच विसर्जन केले, यापुढे तरुणांना उद्ध्वस्त करणारे खेळ खेळणार नाही, असे सगळीकडे बेधडक सांगणारा पूर्वीचा मटका, जुगार माहीर पुन्हा सक्रीय झाल्याचे मजेशीरपणे नाक्या नाक्यावर बोलले जाते. जुना खेळाडू पडद्यामागे असल्याने मस्त चाललंय आमचे असे म्हणत बिनबोभाट क्लब जुगार अड्डे रात्रंदिवस सुरू आहेत. दरम्यान, रोहा शहरात सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे जुगार, मटका अड्डे चालू आहेत, चक्क शहराच्या प्रवेशद्वारासमोरील हॉटेल, बायपास रस्त्यालगत असणार्‍या जुगाराची माहिती रोहा पोलिसांना नसावी याचे आश्चर्य आहे, यातूनच पोलिसांचे दुर्लक्ष होत असावे ? असा सवालही उपस्थित झाला आहे, तर पूर्वीचा मटका खेळाडू पुन्हा खरंच सक्रीय झाला की काय ? याबाबत रोहेकरांत एकच चर्चा रंगली आहे.

रोहा ग्रामीणात गावठी हातभट्टी तर शहरात मटका, जुगार क्लब कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. अनेक वर्षे बंद असलेला मटका, त्याहून परवानगी घेतल्याचा अविर्भावात सांगणारे जुगार क्लब अड्डे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली की काय ? असेच माताभगिनी, सुजन नागरिक विचारत आहेत. आधीच गावठी हातभट्टी, विषारी ताडीमाडीने आमची पोरं देशोधडीला लागली. याकडे पोलीस विशेषत: दारूबंदी खाते विभागाला लक्ष द्यायला वेळ नाही. सर्व गणिते सहकार्याने सोडवितात, हे भयान वास्तव असतानाच शहरात पुन्हा नव्याने जुगाराचे नवे पर्व सुरु झाले. क्लब जुगार सेंटर पूर्वीच्या मटका खेळाडू यांच्या कृपाक्षेत्राखाली सुरू आहे. राजकीय ताकद असल्याने जुगार अड्डा बिनभोबाट सुरू राहील, असा विश्वास माहीर खेळाडूला वाटत आहे, मग काय ? शहराच्या प्रवेशद्वारासमोरील हॉटेल व बायपास रस्त्यालगत मटका, जुगार क्लब चालू आहे. याची कल्पना अजूनही पोलिसांना नसल्याचे समजते. काही ठिकाणच्या मटका, जुगार क्लब अड्डयाने प्रौढ, तरुण पिढी आर्थिकदृष्ट्या कोलमडत आहे. तरूण अक्षरशः उद्ध्वस्त होत आहे, अशी दबकी चर्चा शहरात नुकतीच सुरू झाली. काही सुजाण नागरिकांनी सलाम रायगडला सांगत तरुण पिढीला यातून वाचवा, असा आग्रह धरला आणि पडद्यामागे बिनधक्क सुरू असलेला क्लब जुगार समोर आला आहे.

तालुका ग्रामीणात गावठी हातभट्टीला सुगीचे दिवस आलेत, धाटाव, वरसे यांसह कोलाड, ऊसर विभागात गावठी हातभट्टीचे उत्पादन व विक्री जोरात सुरू आहे, याबाबत मागील महिन्यात सलाम रायगडने हातभट्टीचा वाढता पेग समोर आणला. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी तातडीने दखल घेत अनेक ठिकाणच्या हातभट्टी उदध्वस्त केल्या. तरीही धाटाव वरसे विभागात हातभट्टी विक्री जोरात सुरू आहे, धडधाकट तरुण हातभट्टीच्या आहारी जात आहेत, हे धाटाव विभाग पोलिसांना कधीच समजले नाही. याच व्यसनात आता कॉर्पोरेट जुगार क्लबची भर पडली. त्यांचा जुना जाणता खेळाडू नव्या दमाने सक्रिय झाला. हॉटेल व इतर दोन तीन ठिकाणी जुगार क्लब सेंटर धाडसाने सुरू केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे संबंधीत हॉटेल व इतर ठिकाणी नेमके काय चालते, जुगार क्लब चालतो का, चालत असेल तर परवानगी कोणी दिली ? याची चाचपणी करून जुगार क्लबची नशा कायम उतरावी अशी मागणी आता जोर धरत आहे. जुगार क्लबसाठी जणूकाही वरच्यांनी परवानगी दिली, असाच जोश जुगार क्लबच्या जुन्या खेळाडूने दाखवून दिला. त्यामुळे नेमका प्रकार काय, याकडे लक्ष घालून जुगार क्लब अड्ड्यावर नवे पोलीस निरीक्षक संजय पाटील कारवाई करतील का ? अशी अपेक्षा आता नागरिकांतून व्यक्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *